मंडळी गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलच राजकीय सुडनाट्य रंगलय. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून एकमेकांना कोठडीत डांबण्याचा प्रयत्न सद्ध्या राजकारणात सुरू आहे. नवाब मालिकांची अटक असो, अनिल देशमुखांची अटक असो. आता देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, राज्यभरात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून,महाविकास आघाडीसरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. शिवाय फडणवीसांना आलेल्या नोटीसवरून निषेधसुद्धा नोंदवला आहे.
फडनवीसांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा उपस्थित आहेत, तर दुपारी १२ वाजेपासून फडणवीसांची चौकशी सुरू आहे. फणविसांनी याआधी प्रसार माध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडीवर आरोप केला होता की, महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुद्दाम खोटे आरोप करून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजप नैराश्याने अस वागत आहे- आदित्य ठाकरे
मंडळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे भाजप नेत्यांची व कार्यकर्त्यांची गडबड झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीसुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की,
” प्रत्येक गोष्टीच राजकीय भांडवल करायचं हे आता भाजपाने ठरवलं आहे, अस दिसतंय. असा त्रास देण्याचं, ईडी, सीबीआय, आयकर विभाग याचा पुरेपूर उपयोग ते करतात. इथे मात्र साधं पोलीस चौकशीलासुद्धा जायचं नाही आणि तिकडे मात्र कायदेशीर, बेकायदेशीर आरोप लावायचे.”
अस छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल. याव्यतिरिक्त शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं की,
” मी कुठल्याही न्याय प्रक्रियेवर किंवा पोलीस प्रक्रियेवर फार काही बोलत नाही. भाजपाची आरोप करण्याची सवय आहे. आम्ही त्यावर उत्तर देत नाही आम्ही आमच काम करतो. भाजपासमोर नैराश्य असल्याने ते असे वागत आहेत.”
अशाप्रकारची टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली. मात्र या संपूर्ण प्रकरणावर भाजप काय प्रतिक्रिया देत यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.