समता, बंधुता आणि एकात्मतेचा पुरस्कार करणाऱ्या क्रांतिकारक, विचारवंत भगतसिंगांचे विचार जे कणभरही स्वीकारू शकत नाहीत असे धार्मिक व्देष पेरणारे धर्मांध \’भगतसिंग आमचेच\’ म्हणत नेहरू, गांधींना भगतसिंगांच्या विरुद्ध टोकाला उभे करताना दिसतात. अशा वेळी सर्वसामान्यांची संभ्रमावस्था निर्माण होते. अनेक विधवानांनी नैतिकता सोडत अतिशय विकृत मानसिकतेतुन गांधी, नेहरुंच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवले. लाखो तरुणांच्या मनात व्देष पेरला. व्हाट्सएप युनिव्हर्सिटित गांधी,नेहरूंचे फिरणाऱ्या फेक अश्लील फोटोंमुळे धर्मांधांच्या चुकीच्या द्वेषपूर्ण इतिहासास आपण बळी पडतो. त्यांचा हेतू साध्य होतो.
भगतसिंगांच्या समकालीन साधनांचे वाचन करत असताना. त्यावेळीची परिस्थिती, भगतसिंग व इतर स्वातंत्र्य संग्रामातील नेते यांच्यामध्ये नेमके कसे संबंध असतील याचा अंदाज येतो. भगतसिंग सडेतोड निर्भीड लेखक होते.
वयाच्या 18, 19व्या वर्षी एका साप्ताहिकामध्ये पत्रकार म्हणून काम करणाऱ्या भगतसिंगांचे गांधी, नेहरूंसोबत मतभेद होते. भगतसिंग गांधी, नेहरुंवर अनेकवेळा टीका करतात. पण बऱ्याच वेळा गांधी, नेहरूंचे कौतुकही करतात. ज्यांच्यावर झालेल्या लाठीहल्याचा बदला घेण्यासाठी भगतसिंगांनी सॉण्डर्सचा वध केला त्या लाला लचपत राय यांच्यावरही भगतसिंगांनी टीका केलीय. म्हणून काय भगतसिंग लालजींच्या विरुद्ध भूमिकेचे होते असे नाही. हेच सूत्र नेहरू, गांधींच्या बाबतीत ही लागू होत. भगतसिंगांशी टोकाचे मतभेद होते पण मनभेद नाही.
गांधींची असहकार चळवळ चालू झालेली. ही क्रांती वसाहतवाद, वर्चस्ववाद, भांडवलशाही विरुद्ध होती. इंग्रजांच्या आर्थिक नाड्या आवळण्याची गांधींची योजना सफल झालेली. देशभरात इंग्रजांच्या विरोधात असंतोषाची लाट होती. भगतसिंगांच्या बरोबर अनेक क्रांतिकारक या असहकार चळवळीत सहभागी झाले. 1919 ते 1922 असे चार वर्षे चळवळ जोमात चालली. इतक्यात चौरी-चौरा याठिकाणी चळवळीला हिंसक वळण लागले. जमावाने पोलीस स्टेशन जाळत 21 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली. याघटनेमध्ये काही नागरिकांचा ही मृत्यू झाला. असहकार चळवळ चालू ठेवली तर अनेक ठिकाणी चळवळीला हिंसक वळण लागेल. अनेकांना प्राण गमवावा लागेल हे अहिंसेचे पुजारी गांधींना मान्य नव्हते. गांधींनी असहकार चळवळ थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी क्रांतिकारकांचा एक गट नाराज झाला. भगतसिंग ही गांधींवर नाराज होते. भगतसिंगांच्या लिखाणात असहकार चळवळ थांबवण्यामुळे गांधीविषयी असणारी नाराजी दिसून येते. ही नाराजी साहजिकच होती. पुढे भगतसिंगांनी \’नौजवान भारत सभा\’ व \’हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेने\’ अंतगत क्रांतिकार्य सुरू ठेवले.
सत्याग्रह ही गांधींनी जगाला दिलेली देणगी.भगतसिंगांनी ही हा सत्याग्रह स्वीकारला. कैद्यांना चांगले जेवण मिळावे, अपमानकारक काम करायला लावू नये, वाचायला पुस्तके व लेखन सामग्री मिळावी अशा मागण्यांसाठी भगतसिंग व क्रांतिकारकानी 113 दिवसांचे प्राणांतिक उपोषण केलं. ज्यावेळी देशवासियांना उपोषणाबाबद कळले तेव्हा देशभरात संतापाची लाट उसळली. जवाहरलाल नेहरूंनी भगतसिंगांची व उपोषण करणाऱ्या क्रांतिकारकांची भेट घेतली. संसदेत गदालोळ चालू झाला. शेवटी जुलमी, महाकाय इंग्रज सरकारला भगतसिंगांसमोर नमत घ्यावे लागले. भगतसिंगांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. भगतसिंगांचे सहकारी क्रांतिकारक बटूकेश्वर दत्त यांना असेंम्बलीत बॉम्ब टाकल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली. बटुकेश्वर दत्त यांना अंदमानला कारावास झाला. शिक्षेच्या वेळी बटुकेश्वर दत्त एकही माफीनामा/वचननामा इंग्रजांना लिहीत नाहीत. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर बटुकेश्वर दत्त गांधीजींच्या \’चले जाव\’ आंदोलनात सहभागी होतात.
सन 1918साली बारदोली गुजरात येते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गांधींनी सत्याग्रह केला. इंग्रज सरकारने शेतकऱ्यांच्या पिकावर 22 टक्के कर आकारणी सुरू केलेली. तीन वर्षे सत्याग्रह चालला पण शेवटी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. याप्रकरणी भगतसिंग गांधीजींचे कौतुक करतात. भगतसिंगाना गांधीची अहिंसा भेकड वाटत होती. अहिंसेच्या मार्गाने जनतेला जागे करण्याची शक्ती आहे हेही भगतसिंगाना मान्य होते, पण या क्षणी देशाला त्याच्या उद्दीष्यांपर्यंत, स्वातंत्र्यापर्यंत लवकरात लवकर पोहचण्यासाठी अहिंसेचा उपयोग होणार नाही असे त्याना वाटत होते. ते हिंसक आणि अहिंसक ही नव्हते चिकित्सक क्रांतिकारक होते. भगतसिंगाचा अहिंसेवर विश्वास नव्हता, पण हिंसेवर विश्वास होता असेही नाही. भगतसिंग म्हणतात क्रांती म्हणजे पिस्तुले आणि बॉम्ब यांची संस्कृती नव्हे. क्रांती विचारांच्या माध्यमातून घडत असते.
सॉडर्सच्या हत्येनंतर जी पत्रके फेकली त्यामध्ये क्रांतिकारकांची भूमिका स्पष्ट होते. त्या पत्रकात म्हंटलय, \”मनुष्य का खून बहाने के लिए हमें खेद है, परंतु क्रांती की बलिवेदी पर खून बहाना अनिवार्य हो जाता है। हमारा उद्देश ऐसी क्रांती से है, जो मनुष्य द्वारा मनुष्य के शोषण का अंत कर देगी।\”
गांधीजीनी अहिंसेच्या मार्गाबरोबर जनशक्ती उभी केली, पण हिंसेच्या मार्गाबरोबर लोकशक्ति उभी करणे अवघड असते. जगात अशा घटना क्वचित घडतात. भगतसिंगानी भारतात ही किमया घडवली. लोकांना क्रांतीकारकांच्या विचारामागे उभे केले.
भगतसिंगांच्या फाशीसाठी गांधींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. मुळात भगतसिंगांनी ते पाऊल उचले ते बलिदानासाठी, माफीनामा/वचननामा लिहून शरणागती पत्करण्यासाठी नव्हे. बहिऱ्यांना ऐकू जाण्यासाठी मोठा आवाज करायची गरज होती. 30 कोटी जनतेच्या आवाजाने इंग्रज सरकारच्या कानठळ्या बसवायच्या होत्या. म्हणूनच असेंम्बलीत मोकळ्या जागेत बॉम्ब टाकला. कोणाला इजा होऊ नये याची विशेष काळजी घेतली. आत्मसमर्पण केले. भगतसिंगांच्या वडिलांनी आपल्या मुलाची फाशी रद्द व्हावी म्हणून ब्रिटिश गव्हर्नरकडे प्रार्थनापत्र पाठवले. भगतसिंगाना हे वृत्त कळताच ते कासावीस झाले. अशा अवस्थेत वडीलांना वर्तमानपत्रातून जाहीर पत्र लिहले, त्या पत्रात भगतसिंग म्हणतात,
\’मुझे ये जाणकार हैरान हुई कि आपने मेरे बचाव-पक्ष के लिए स्पेसिल ट्रीबुशन को आवेदन भेजा है। यह खबर इतनी यातनामय थी कि मैं इसे खामोशी से बरदास्त नहीं कर सका। इस खबर से मेरे भीतर की शांती भंग कर उथल-पुथळ मचा दी है।\’
भगतसिंगांच्या या पत्रावरून समजते की फाशी थांबावी हे स्वतः भगतसिंगाना मान्य नव्हते. मुळात देशवासियांच्या मनात क्रांतीची लाट यावी यासाठी भगतसिंगाना स्वतः बलिदान द्यायचं होत. त्यामुळे गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवावी हा प्रश्नच उद्धभवत नाही. भगतसिंगांची फाशी थांबावी यासाठी गांधींनी केलेल्या प्रयत्नानचे अनेक संदर्भ ही सापडतात. गांधींनी मदन मोहन मालवीन, पंडित जवाहरलाल नेहरू यांना भगतसिंगांच्या भेटीसाठी पाठवले. दयेचा अर्ज केला तर फाशी थांबेल यासाठी गांधी खटपट करत होते. पण भगतसिंगाना फाशी थांबावी हे मान्य नव्हते. जर त्यावेळी फाशी थांबली असती तर आज तुम्ही-आम्ही भगतसिंगांच्या बलिदानापासून अपरिचित असतो. देशवासियांच्यात ती देशभक्तीची लाट दिसली नसती.
गांधींना भगतसिंगांच्या सारखे प्रखर देशभक्त युवक गमावणे योग्य वाटत नव्हते. गांधी म्हणायचे भगतसिंगांच्या सारख्या युवकांची गरज आहे. भगतसिंगांच्या सारखे पाऊल उचलून स्वतःचे बलिदान देवु नका. भगतसिंगांच्या फाशीनंतर सरदार वल्लभभाई पटले, नेहरूंच्या सारखे राष्ट्रीय नेते देशातील युवकांना भगतसिंगांच्या अतुलनीय साहसाचे कौतुक करताना, असे साहस करून आपला जीव धोक्यात घालू नका. त्यांच्या कृतीचे अनुकरण करू नका. स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळवू हे आवाहन करतात.
भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने संपादित केलेल्या \’अभ्युदय\’ ह्या समकालीन साप्ताहिकात म्हंटल्याप्रमाणे भगतसिंग फाशीच्या तक्ताकडे जाताना त्यांची आवडती कविता म्हणतात, तीही अशी-
मेरा रंग दे बसन्ती चोला ।
इसी रंग में गांधी जी ने, नमक पर धावा बोला ।
मेरा रंग दे बसन्ती चोला ।
इसी रंग में वीर शिवा ने, माँ का बन्धन खोला ।
मेरा रंग दे बसन्ती चोला ।
इसी रंग में भगत दत्त ने छोड़ा बम का गोला ।
मेरा रंग दे बसन्ती चोला ।
इसी रंग में पेशावर में, पठानों ने सीना खोला ।
मेरा रंग दे बसन्ती चोला ।
इसी रंग में बिस्मिल अशफाक ने सरकारी खजाना खोला ।
मेरा रंग दे बसन्ती चोला ।
इसी रंग में वीर मदन ने गवर्नमेंट पर धावा बोला ।
भगतसिंगांच्या ह्या आवडत्या कवितेत गांधींचा उल्लेख आढळतो. ह्या कवितेवरून तीव्र मतभेद असून भगतसिंगांच्या मनात असणारा गांधींविषयीचा आदर स्पष्ट दिसतो.
जुलै 1928 साली \’किरती\’ या साप्ताहिकात सुभाषचंद्र बोस व जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी भगतसिंग लिहतात,
\”बडे-बडे नेता बडे होने के बावजूद एक तरह से पिछे छोडे जा रहे है। इस समय जो नेता आज आये है वे है- बंगाल के पूजनीय श्री सुभाषचंद्र बोस और पंडित श्री जवाहरलाल नेहरू। यही दो नेता हिंदुस्थान मैं उभरते नजर आ रहे है और युवाओं के आंदोलन मै विशेष रूप से भाग ले रहे है। दोनो ही हिंदुस्तान की आजादी के कट्टर समर्थक है। दोनोही समजदार देशभक्त है।\”
आजपर्यंत नेहरूंकडे तुच्छतेने बघायला शिकवले गेले. अत्यंत द्वेषपूर्ण बुद्धीने नेहरूंसोबत अनेक भाकडकथा रचल्या. भगतसिंगांच्या वरील ओळीमुळे भगतसिंगांच्या मनात नेहरूंविषयी किती आपुलकी होती हे लक्षात येते.
क्रांतिकारकांच्या म्हणजेच दस्तुरखुद्द भगतसिंगांच्या घराण्यात जन्म घेणाऱ्या भगतसिंगांच्या पुतनी वीरेंद्र सिंधू यांनी \’अमर शहीद भगतसिंग\’ या पुस्तकात क्रांतिकारकांच्या जहाल व मवाळ या दोन गटाविषयी प्रकाश टाकणाऱ्या ओळी लिहतात. वीरेंद्र सिंधूनच्या यावाक्यांमुळे क्रांतिकारकांच्या मध्ये तीव्र मतभेद असले तरी मनभेद अजिबात नव्हते याची कल्पना येते. वीरेंद्र सिंधू लिहतात,
\”समय के साथ-साथ विचारो मैं भी परिवर्तन आए और कांग्रेस मैं नरम और गरम दो दल बने। सुभाष बाबू जहा देश में सशस्त्र कांती के पोषक थे, तो गांधी अहिंसा से स्वतंत्रता प्राप्त करने के ढंग को सर्वोत्तम मानते थे। प्रश्न यही नही कि कौन सा ढंग उचित था, कौन सा नही। महत्व इस बात का है कि लक्ष्य एक था और उसकी पुर्ती के साधन दोनो ही अपने-अपने स्थान पर उपयुक्त थे।
आजपर्यंत भगतसिंगांचे नाव घेऊन धार्मिक व्देष पेरण्यात आला. गांधी,नेहरूंच्या विरोधात उभे केले. भगतसिगांचे विचार आत्मसाद केल्यास मनातला व्देष मिटून जाईल. भगतसिंगांच्या स्वप्नातला भारत उदयास येईल. आता क्रांतिकारक सर्वांना दिखाव्यासाठी हवेत, ते जिवंत नाहीत हेच बरे अन्यथा ही स्थिती पाहून त्यांचा जगण्यावरचा विश्वास उडला असता. भगतसिंग आत्मसाद करून स्वार्थाने, अन्याय-अत्याचाराच्या अंधकाराने ग्रासलेला भारत मुक्त केला पाहिजे.
सगळं उलथवून टाकलं पाहिजे. जात, धर्म, प्रांतीयता, लिंगभेद याच्यापलीकडे जाऊन बलशाली आणि समृद्ध भारतासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. धर्मांध धार्मिक संघटनांच्या द्वेषापासून महापुरुषाना वाचवूया. तेही मोकळा श्वास घेऊदेत. जाती-धर्माच्या चौकटीत बंदिस्त झालेल्या महापुरुषाना मुक्त करूयात. भगतसिंगांच्या स्वप्नातला भारत घडवू. उद्याच्या भारताला नवीन आकार देवु.
-प्रतिक दिपक पाटोळे.
विद्यार्थी- तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर.
मो.नं.7559198475
संदर्भ-
◆अमर शहीद भगतसिंग- वीरेंद्र सिंधु
◆भगतसिंग और उनके साथीयों के संपूर्ण उपलब्ध दस्तावेज- राहून फाऊंडेशन प्रकाशन लखनऊ
◆अमर शहीद को नमन- राष्ट्रीय अभिलेखगार नई दिल्ली
(अभ्युदय के भगत सिंह विशेषांक व अन्य अंको पर आधारित)
◆भगतसिंग और उनके साथीयौ के दस्तावेज- राजकमल प्रकाशन नवी दिल्ली पटना.
◆सरदार भगतसिंग- संजय नहार
◆शहीद भगतसिंग भारतीय युवा क्रांतीचा प्रणिता- दत्ता देसाई
◆शहीद भगतसिंग चरित्र आणि कार्य-प्रा.डॉ.नवनाथ शिंदे
◆मी नास्तिक का आहे?-शहीद भगतसिंग
◆भगतसिंग जेल डायरी