राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची जयंती हा केवळ स्मरणाचा दिवस नसून शौर्य, त्याग आणि राष्ट्र उभारणीच्या तत्त्वांना समर्पित झालेला उत्सव आहे. १२ जानेवारी हा दिवस भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक जडणघडण घडवण्यात, राजमाता जिजाऊ यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची एक मार्मिक आठवण आहे. जिजाऊसाहेबांनी केलेल्या त्यागाचं, संघर्षाचं प्रतीक म्हणून हा दिवस आहे.
राजमाता जिजाऊ साहेबांचा जीवनपट उलगडून पाहत असताना त्यांच्याबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं. राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले असे जिजाऊंचे संपूर्ण नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे भुईकोट राजवाड्यामध्ये राजे लखोजीराव जाधव व आई म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. म्हणूनच १२ जानेवारी ह्या त्यांच्या जन्मदिनी राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली जाते.
इतिहासात एवढी वर्ष उलटून गेल्यानंतरही आपल्याला त्यांची जयंती साजरी करावीशी का वाटते? तर यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्या कृती आणि शिकवणींद्वारे, आजही जिजामाता खूप लोकांना प्रेरणा देतात.
जिजाऊ ह्या स्वराज्यवादी विचारधारेच्या महान पाठीराख्या होत्या. गुलामगिरीची त्यांना खूप चीड होती, सामान्य रयतेवर मुघलांकडून होणारे अत्याचार थांबवण्याची, तसेच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची त्यांची ईच्छा होती. म्हणून जिजाऊंना वाटायचे कि, त्यांच्या पोटी असा पुत्र जन्मावा कि, ज्याच्या नावाचा झेंडा त्रिलोकात पसरावा. आणि जिजाऊंच्या अंगी असणारी स्वराज्याची प्रेरणा बघून देवाने त्यांच्या पोटी असं पुत्ररत्न जन्माला घातलं की ज्याने पुढे चालून मुघलांना पळता भुई थोडी केली. जिजाऊंनी १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला.
जिजाऊ यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी होते. त्या एक योद्धा होत्या म्हणूनच त्यांनी प्रत्येक संकटा विरुद्ध शूरपणे आणि खंबीरपणे लढा दिला. वेळ प्रसंगी त्या रणांगणात उतरण्यासाठी तयार असायच्या. त्यांची स्वत:ची अशी एक विशिष्ठ विचारसरणी होती. जिजाऊंचे देश व धर्मावर अत्यंत प्रेम होते त्यांनी हेच धडे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा दिले.
मराठी साम्राज्य स्थापन करण्यात जिजाऊंचा सिंहाचा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारातील प्रत्येक गोष्ट जिजाऊंच्या मार्गदर्शनाने केली. कारण त्या अत्यंत हुशार आणि चाणाक्ष होत्या तसेच मुत्सद्दी राजकारणात देखील माहीर होत्या. स्वराज्य मिळवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी त्याचा छावा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून पूर्ण करुन घेतले. म्हणूनच त्यांना स्वराज्यजननी असे संबोधले जाते.
✍️शब्दांकन – शिवव्याख्याते आशिष पगार (८९९९५१५४२०)