मुलाच्या वक्तव्यामुळे गडकरींची अडचण, पक्ष व कार्यकर्ते बॅकफुटवर

Vikas Thakre VS Nitin Gadkari Loksabha Elections Nagpur 2024

विकास ठाकरेंची प्रचारात सरशी, मुलाच्या वक्तव्यामुळे गडकरींची अडचण, पक्ष व कार्यकर्ते बॅकफुटवर, सोशल मिडियावर ठाकरेंची जादू

विकास ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे नागपूर लोकसभेची लढत अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली आहे. 10 वर्ष खासदार आणि केंद्रात हेवीवेट मंत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या नितीन गडकरींना ठाकरेंचे आव्हान थोपवण्यासाठी गल्लोगल्ली प्रचार करावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी आपण यंदा प्रचार करणार नाही, होर्डींग्ज लावणार नाही, कुणाला चहा पाजणार नाही असा दावा केला होता. मात्र निवडणूकीत ठाकरे यांच्या एंट्रीनंतर गडकरींना गल्ली बोळात प्रचाराला उतरावे लागले आहे.

एप्रीलच्या सुरुवातीपासूनच नागपुरात उन्हाचा तडाखा जाणवतो आहे. प्रचारावरही याचा प्रभाव दिसून येत आहे. गडकरी यांनी प्रचारासाठी खास रथ तयार केला असून त्या रथात वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. या उलट ठाकरे हे खुल्या जीपमधून उन्हातान्हात लोकांचे स्वागत स्विकारत दुपारी उशीरापर्यंत जनसंवाद साधत आहेत. गडकरी रोड शो विधानसभा स्तरावर आखला राबविला जात आहे. तर विकास ठाकरे यांनी एका दिवसात फक्त दोन प्रभागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ठाकरे दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये जीपखाली उतरुन लोकांची भेट घेतात दुसरीकडे गडकरी मात्र रथावरुन खाली उतरत नाहीत. गडकरींच्या रथावर छप्पर आहे तर भाजपचे कार्यकर्ते मात्र रखरखत्या उन्हात प्रचार करण्यासाठी मजबूर आहेत. कुठलाही दिखावा किंवा बडेजाव न करीता मॅन टू मॅन संपर्कावर ठाकरे यांचा भर आहे त्यामुळे त्यांना मिळणारा प्रतिसाद हा सकारात्मक व आश्वस्त करणारा आहे.

सामाजिक समिकरण विकास ठाकरेंच्या बाजूने
नागपूर लोकसभेचे सामाजिक समीकरण हे यंदा विकास ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे दिसते. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा उमेदवार नसल्याने ही मते काॅंग्रेसकडे वळतील असा अंदाज आहे. बसपाची ताकत कमी झाल्यामुळे याचा फायदा देखील काॅंग्रसला होऊ शकतो. मध्य नागपुरात बहुसंख्येने असलेल्या हलबा मतदारांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. शिवाय कुणबी व इतर ओबीसी मतांचे संभावित कन्साॅलिडेशनही काॅंग्रेसच्या पथ्यावर पडू शकते.

5 लाखाच्या लीडची हवा गोल
यंदाच्या निवडणुकीत आपण पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येऊ असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. यापूर्वी 2014 व 2019 च्या निवडणुकीत सुद्धा गडकरी यांनी असा दावा केला होता मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांना आपले मताधिक्य 3 लाखांच्या पुढे नेता आले नाही. गडकरी जरु पुन्हा पुन्हा पाच लाखाच्या मताधिक्याच्या बाता करीत असले तरी आता खुद्द भाजप कार्यकर्तेच खासगीत या दाव्याची खिल्ली उडवतांना दिसत आहेत.

सारंग गडकरींच्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर
गडकरी यांचे धाकटे चिरंजीव सारंग गडकरी यांचे वक्तव्य भाजपच्या कर्मठ कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे.

2014 मध्ये नागपूर लोकसभा ही भाजपची सीट नव्हती, ही सीट भाजपमुळे निवडून आली नाही यंदाही ही सीट भाजपमुळे नव्हे तर गडकरींच्या ताकतीमुळे निवडून येईल असा दावा सारंग गडकरी यांनी केला होता.

सारंग गडकरी यांचा हा विडियो समाज माध्यमांवर जोरदार वायरल झाला त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. गडकरींना कार्यकर्त्यांची गरज नाही ते स्वतःच सक्षम आहेत असे म्हणत अनेक कार्यकर्त्यांनी प्रचारापासून स्वतःला अलिप्त ठेवले की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

प्रचार सभांदरम्यान नितीन गडकरींकडून होणार्‍या अवास्तव दाव्यांमुळे मोठी गोची होत आहे. नागपूर शहरातील 70 टक्के वस्त्यांमध्ये 24 तास पाणीपूरवठा, मिहानमध्ये 1 लाख तरुणांना रोजगार दिला, नागपूरात 1 लाख कोटी रुपयांची विकास कामे केली हे दावे आता मतदारच खोडून काढत आहे. स्थानिक यूट्यूब व सोशल मिडिया चॅनल्सच्या रियालिटी चेकमध्ये मतदारांच्या प्रतिक्रिया बघितल्यास याचा अंदाज येईल. गडकरी साहेबांनी वास्तविकता मांडावी उगाच फेकाफेकी करुन दिशाभूल करु नये असे मत अनेक मतदार व्यक्त करीत आहेत.

गडकरींच्या “प्यारे” खानमुळे भाजपला नुकसान
सारंग गडकरी यांचे व्यावसायिक सहकारी व गडकरी यांचे चाहते प्यारे खान हे अल्पसंख्यांक मते मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहेत. मोमिनपूरा, ताजबाग, हसनबाग, टेका नाका, जाफरनगर या मुस्लीम बाहुल्य वस्त्यांमध्ये प्यारे यांनी इफ्तार पार्टींचा धडाका लावला आहे. इफ्तारीच्या माध्यमातून गडकरींकडे मुस्लीम मतदारांना आकर्षिक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र या खटाटोपामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होण्याची शक्यता आहे. मुस्लीम नेता किंवा समाजातील प्रभावी व्यक्ती म्हणून प्यारे खान यांना अजूनही समाज मान्यता नाही. प्यारे हे व्यक्तिगत फायद्यासाठी हे सर्व करीत असल्याचा सूर मुस्लीम समाजातून ऐकायला मिळत आहे.

गडकरी यांनी गेल्या 10 वर्षात मुस्लीम समाजातील किती युवकांना रोजगार मिळवून दिले असा प्रतिप्रश्न मुस्लीम समाजातील मतदार प्यारे खान यांना विचारत आहेत. सीएए आंदोलन, बिस्किस बानो प्रकरण, एनआरसी, माॅब लिंचींग यांसारख्या संवेदनशील मुद्यांवर गडकरींची भूमिका काय असा सवाल मुस्लीम मतदारांकडून विचारला जात आहे.

सोशल मिडियावर विकास ठाकरेंची स्थिती मजबूत
गडकरी यांच्या तुलनेत संसाधनांचा अभाव असला तरी विकास ठाकरे यांनी सोशल मिडियावरील वातावरण ढवळून काढले आहे. नागपूरच्या जनतेचे सवाल, मी दीक्षाभूमी बोलतेय, जवाब दो, रियालिटी चेक या मथळ्याखालील पोस्ट व विडियो मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. एका झटक्यात वायरल होणार्‍या पोस्टमुळे ठाकरे तळागाळात पोहोचले आहेत. या उलट गडकरी यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावरुन सुरु असलेला प्रचार हा काहीसा कृत्रिम व दिखावटी वाटत आहे. सोशल मिडीया इन्फ्लूएन्सर, आयटी सेल, माजी संपादक मंडळी, पगारी यंत्रणा गडकरींच्या दिमतीला असली तरी ठाकरेंच्या मोजक्या टीमने खासदारांच्या प्रचार यंत्रणेच्या नाकात दम आणला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *