सुपर मार्केटमध्ये दारू विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने राज्यसरकारचा चांगलाच विरोध केला आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार तसेच वाईन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपर मार्केट तसेच किराणा दुकानमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मात्र या निर्णयाचा भारतीय जनता पक्षाकडून चांगलाच विरोध होतांना दिसत आहे.
राज्यातील दारुऐवजी पेट्रोल डिझेलचे भाव कमी असून काही काही जिल्ह्यातील दारूबंदी संपवून नवीन दारू विक्रीला परवानगी देणे चुकीचे असल्याचं मत भारतीय जनता पक्षाने व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाविरुध्दचा आपला आक्रोश व्यक्त करत म्हटलं की,\” हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे.\”
महाराष्ट्राच्या मद्यराष्ट्र होतोय- भाजप
महाराष्ट्र राज्यातील किराणा दुकानातसुद्धा आता वाईन मिळणार असल्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. मात्र याचा भारतीय जनता पक्षाने कडाडून विरोध केला आहे. राज्यसरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी, ठाकरे सरकारचे मद्यप्रेम यापूर्वीही दिसून आले आहे.
पब , पेग , पार्टी आणि दारू याबाबत अतिसंवेदनशील असलेल्या राज्यसरकारने भविष्यात चोवीस तास नळावाटे दारू उपलब्ध करून दिल्यास नवल वाटू नये, असा टोला राज्यसरकारवर त्यांनी मारला. कोरोनामधल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विचार कधी विधिमंडळात केल्या जात नाही. त्यांच्या उदरनिर्वाहाची साधनं त्यांना कशा प्रकारे उपलब्ध होतील, याचा विचार केल्या जात नसेल तर हे सरकार बेवड्यांना प्रेम दाखवणार सरकार आहे. अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की, \”राज्यसरकार हे वाईन विक्रीसाठी परवानगी देऊन कष्टकऱ्यांचे घर उध्वस्त करण्याचं काम करत आहे. जनतेच्या हिताचे निर्णय कधीच या महाविकास आघाडीच्या सरकारने घेतले नाही. नेहमी कशा प्रकारे महाराष्ट्रातील जनतेला हानी होईल याचा विचार राज्य सरकारने केला आहे. सुपर मार्केटमध्ये व किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देऊन राज्यसरकार या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा मागे लागलं आहे.\” अस ते म्हणाले.