\”ए, कशाला लिहीतो रे राजकीय पोस्ट. आमच्या नेत्याला काही बोललास महागात पडेल.\” , \”आमच्या पक्षाविरोधात बोलतो? तू कुठं रहातोस. पत्ता दे. तुला तिथं येऊन मारतो.\” अशे लै लै लै मेसेज येऊन पडत्यात. मी हिंगलूनबी इचारत नाय असल्यांना. मला बोट बी लावायचा दम नाय कुनाच्यात. मी छत्रपती शिवरायांचा मावळाबी हाय-तुकोबारायाचा शिष्यबी हाय आनि शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार रक्तात भिनवलेला वाघ बी हाय. हे काॅम्बीनेशन लै डेंजर भावांनो. नाद करू नये शहान्यानं ! असो पन
\”किरणसर, आम्ही तुमचे फॅन आहोत. तुम्हाला कुणी वाईटसाईट बोललेलं आम्हाला सहन होत नाही. तुम्ही राजकारणावर लिहू नका.\” असेही मेसेजेस येतात. त्यांना उत्तर देनं माझं कर्तव्य आहे. माझ्यावर प्रेम करनार्यांची मी कदर करतो.
..भावांनो, आज मी कारन सांगतो. बघा तुमाला पटतंय का. थांबा थांबा, त्याआधी बर्टोल्ट ब्रेख्त नांवाच्या एका महान नाटककाराची गोष्ट सांगतो. शेक्सपिअरइतकाच मोठा नाटककार आनि लै संवेदनशील कवी व्हता त्यो. आज बी आमी नाटकवाले ब्रेख्तच्या वाटेवरनं चालतो.
…ब्रेख्तच्या काळात भवताली लै बेक्कार वातावरन होतं. हिटलरच्या हुकूमशाहीनं धुमाकूळ घातलावता. चांगल्या मानसांचं जगनं मुश्कील झालंवतं. हिटलरच्या विरोधात बोललं की धमक्या, अर्वाच्य शिविगाळ तर व्हायचीच. पन अन्यायाविरोधात आवाज उठवनार्यांची तोंडं बंद करन्यासाठी हे नराधम कुठल्याबी खालच्या थराला जायचे. ब्रेख्तनं कुनाला न जुमानता हिटलरच्या धोरनांविरोधात जोरदार लेखन केलं. त्यावेळी हिटलर विरोधात लिहिनार्यांच्या पुस्तकांवर हिटलर बंदी घालायचा. पन कसं कुनास ठावूक? हिटलरच्या शातीर नजरेतनं ब्रेख्तचं पुस्तक सुटलं व्हतं. त्या पठ्ठ्यानं थेट हिटलरला पत्र लिव्हलं – \”मी पण तुझ्या विरोधात लिहीले आहे. कृपा करून माझ्या पुस्तकावर बंदी घाल. नाहीतर इतिहास असं समजेल की मी तुझ्या बाजूनं होतो. किंवा असंही समजलं जाईल की मी इतकी महत्त्वाची व्यक्ती नव्हतो की तू घाबरुन माझ्या पुस्तकावर बंदी घालावीस.\”
…गड्याहो, भवताली मानवतेविरोधात गोष्टी घडतायत आनि कलाकार त्याबद्दल संवेदनशील नसंल तर तो मुर्दाड आहे ! राजकारन दुर्लक्षित करू नका. कुना लुंग्यासुंग्यांच्या शिवीगाळीला, ट्रोलींगला घाबरुन राजकारनावर बोलनं टाळू नका. ब्रेख्तनं लिहुन ठेवलंय.. तेच इस्कटून सांगतो.. राजकारन हे आपल्या, आपल्या आईबापांच्या, आपल्या मुलाबाळांच्या जगन्याची किंमत ठरवतं. आपन खात असलेली डाळ,भात,मासे,मटन,पीठ-मीठ,चप्पलची किंमत,हाॅस्पीटल बिलं, औषधांच्या किमती, पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती..सगळंसगळंसग्ग्गळं राजकीय निर्णयांवरनं ठरतं !! ते दुर्लक्षून कसं चालंल??? जो मानूस छाती फूगवून सांगतो, की \”राजकारन लै बेकार म्हनून मी त्यावर बोलत नाय.\” तो मानूस मूर्ख बेअक्कल असतो..
…तुम्ही राजकारनाकडं केलेल्या दुर्लक्षातूनच जन्माला येत्यात वेश्या… बेवारशी पोरं… चोर… पाकीटमार.. दरोडेखोर.. बलात्कारी.. धार्मिक हिंसा घडवून आननारे जल्लाद आनि सगळ्यात वाईट म्हन्जे या अज्ञानातूनच तुमच्या उरावर नाचतात भ्रष्ट सरकारी अधिकारी, तळवेचाटू पत्रकार आनि अर्वाच्य शब्दांत ट्रोलींग करनारी हुकूमशहांची पिलावळ !!!
आपनबी ब्रेख्त होऊया भावांनो. जागे होऊया. बोला बिन्धास्त. करूद्या ट्रोलींग. बघूया त्यांचा क्रूरपना श्रेष्ठ हाय का आपली संवेदनशीलता… नाहीतर आपली पुढची पिढी समजंल की आपन छाटछूट व्हतो.. भेकड व्हतो.. हुकूमशहाच्या पिलावळींनी शिवीगाळ करन्याइतकंबी महत्त्व आपल्याला नव्हतं !!!
तुका म्हणे मानदंभ जया चित्ती । तयाची फजिती करू आम्ही ।।
ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल….
- किरण माने.
kayyumkhan4335@gmail.com