जाणून घ्या. महाराष्ट्र विधान परिषदेचं स्वरुप नेमकं कसं आहे? विधान परिषद निवडणूक कशी होते?
भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. भारतानी संघराज्य शासन पद्धतीचा स्विकार केला आहे आणि केंद्रा प्रमाणेच राज्यात सुद्धा द्विगृही कायदेमंडळ स्थापन केले आहे. केंद्रात जशी संसद आहे तशी राज्यात राज्याचे विधीमंडळ असते. संसदेत राज्यसभा आणि लोकसभा असे दोन सभागृह आहेत तसेच राज्यात विधानसभा आणि विधान परिषद असे दोन सभागृह आहेत. अशा दोन सभागृह असलेल्या कायदेमंडळाला द्विगृही कायदे मंडळ म्हणतात.
राज्याचे सरकार कसे काम करते हे समजून घेण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद समजून घेणे आवश्यक आहे. विधानसभेतील सदस्य प्रत्यक्ष लोकांद्वारे निवडून दिले जातात परंतू विधान परिषदचे सदस्य अप्रत्यक्ष निवडले जातात त्यामुळे विधानपरिषदची निवड प्रक्रिया आणि विधान परिषद म्हणजे काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
विधान परिषद म्हणजे काय?
भारतातील घटकराज्यांच्या कायदेमंडळातील वरिष्ठ सभगृहला विधान परिषद असे म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, आणि तेलंगणा या ०६ राज्यात सध्या द्विगृही कायदेमंडळ(विधान परिषद) अस्तित्त्वात आहे व तिथे विधानसभे सोबत विधान परिषदेत सुद्धा अस्तित्त्वात आहे. बाकी सर्व राज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेची रचना.
केंद्रात ज्याप्रकारे राज्यसभा हे वरीष्ठ सभागृह असतं त्याप्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरीष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. पण वरीष्ठ सभागृह मानलं जात असलं तरी विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार असतात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171 (1) मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आली आहे.
विधान परिषदेचा कार्यकाळ विधानसभेप्रमाणे पाच वर्षाचा नसून विधान परिषदेतील ०६ वर्ष पूर्ण झालेले एकूण सदस्यसंख्येपैकी एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडून दिले जातात.
राज्याच्या विधानसभेत एकूण २८८ सदस्य आहेत. तर विधान परिषदेतील सदस्य संख्या हि एकूण ७८ इतकी आहे. संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यांतील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान ४० असावी तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश इतकी असू शकते असा नियम आहे. याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त ९६ पर्यंत वाढवता येऊ शकते.
महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. त्यातील ३० सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात आणि २२ सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. तसेच ०७ सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर ०७ सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निर्वाचित होत असतात.
याव्यतिरिक्त राज्याचे राज्यपाल 12 सदस्यांची नामनियुक्त करतात. हे सदस्य वाडःमय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेले असतात आणि त्त्यांनाच विधानपरिषदेवर नामनिर्देशित केले जाते.
विधान परिषद निवडणूक कशी होते?
विधानसभेच्या निवडणुक प्रकिया प्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया नसते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाची पद्धत इथं वापरली जाते. निवडणुकीसाठी जेवढे मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो.
विधान परिषदेच्या निवडणूकीत निवडून येण्यासाठी संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतो. निर्धारित कोट्या एवढे प्रथम क्रमांकांचे मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीचे मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीचे मतं मोजले जाते. अंक जो कोटा पूर्ण करील तो उमेदवार विजयी ठरवला जातो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यामुळे कोणाचेही मतदान वाया जात नाही.
विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते.