सोनिया गांधी ७५ वर्षांच्या आहेत. नरेंद्र मोदी सरकारनं त्यांच्या विरुध्द इडीचे पाळीव जीव सोडलेत. ईडी चावू शकते, भुंकू शकते, पण कोणाचा जीव घेऊ शकत नाहीत. त्यांच्या भुंकण्यामुळे उलट झोपलेला गाव जागा होण्याला मदत होते.
मोदी आल्यापासून सुडाचं राजकारण सुरू झालं आहे. निष्पक्षपणे कारवाई होत असेल तर त्याचं कुणीही स्वागतच करील. पण अलिकडे इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागाच्या साऱ्या कारवाया विरोधकांच्या बाबतीतच का होतात?
आणि तेच भ्रष्ट लोक पक्षांतर करुन भाजपामध्ये गेले की लगेच त्या कारवाया कशा काय थांबून जातात ? भाजपामध्ये भ्रष्ट लोक नाहीतच का? मग त्यांच्या विरोधात ईडी कशी काय चूप बसते?
राफेल, नोटबंदी, गुजरात बंदरावर सापडणारे शेकडो क्विंटल ड्रग्स कुणाचे? त्याचं पुढे काय होते? कुणावरही कारवाई का होत नाही? असंख्य प्रश्न आहेत!
राष्ट्रगीतामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा वाद आणि राष्ट्रगीताचा इतिहास
कपट करुन कौरवांनी पांडवांना वनवासात पाठवलं होतं. जुगारात सहभागी होणं ही पांडवांची चूकच होती. पण द्रौपदीचं वस्त्रहरण ही कौरवांची सर्वात मोठी विकृती होती.
त्यानंतरचा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास संपवून जेव्हा पांडव वापस आलेत, तेव्हा त्याचं राज्य त्यांना परत देणं, हे नैतिकदृष्ट्या कौरवांचं कर्तव्य होतं. पण दुर्योधन, दुःशासनाने पांडवांचं राज्य परत करायला नकार दिला.
तरीही पांडव शांत होते. किमान त्यांना पाच गावं देण्यात यावीत, अशी समंजस भूमिका पांडवांनी घेतली. पण माजलेले कौरव त्यालाही तयार झाले नाहीत. त्यांना ’पांडवमुक्त राज्य’ हवं होतं! माकडांना बागेत कुणीही भागीदार नको होता! आणि शेवटी महायुद्धाचा भडका उडाला.
शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात
नेहरू घराण्यानं देशासाठी केवळ तुरुंगवास भोगला असं नाही, तर स्वतःची मोठी संपत्ती देखील दान केलेली आहे. अर्थात् दारोदारी भीक मागून जगणाऱ्या लोकांनां दातृत्वाचं मोल कळणार नाही!
सोनिया गांधी यांनी चालून आलेलं प्रधानमंत्री पद अनपेक्षितपणे मनमोहन सिंग यांना देऊन टाकलं. राहूल गांधी साधे मंत्री देखील झाले नाहीत.
तरीही त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या लोकांनी आपल्या पक्षातील सर्वोच्च नेत्यांची औकात आणि इमानदारी एकदा तपासून पाहायला हरकत नाही! पण ’खानदानी नंग्याला आरशाची भिती’ असा सारा प्रकार आहे.
कपटानं ताब्यात घेतलेलं पांडवांचं राज्य आपल्याच बापाचं आहे, या भ्रमात कौरव राहीले. द्रोणाचार्य खरेदी केले गेले, भीष्माचार्य खरेदी केले जाऊ शकतात, कर्ण फितूर होऊ शकतो, याचाच अर्थ आपण कुणालाही खरेदी करू शकतो, असा माज कौरवांना चढला होता.
भीष्म, द्रोण, कर्ण म्हणजेच सारी दुनिया असा त्यांचा गैरसमज होता. असे भाड्याचे भीष्माचार्य कोणत्याही काळात नेहमीच उपलब्ध असतात. फितुरी तेव्हाही होत होती, आताही होत आहे!
असा फितुरीचा फटका इंदिरा गांधींना बसला, सोनिया गांधींना बसला आणि उध्दव ठाकरे यांनाही बसला. अर्थात या अलिकडच्या फितुरीत कुणी भीष्म, द्रोण, कर्ण नव्हते, हे ही लक्षात घ्यावं लागेल.
खाऊन पिऊन बेईमान झालेल्यांचं भुरट्या लोकांचं हे बंड होतं! ईडीची भिती आणि सत्तेचं मोठं हाडुक हाच व्यवहार त्यामागे होता, हे जगजाहीर आहे!
कौरव – पांडव यांचा काळ हा राजेशाहीचा काळ होता. तरीही जनता पांडवांच्या बाजूने उभी राहिली. सर्वशक्तिमान वाटणाऱ्या कौरवांना मातीत घातलं. सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांचा काळ तर लोकशाहीचा काळ आहे.
दलाल मिडिया असो, न्यायव्यवस्था असो, सरकारी यंत्रणा असो की आमदार – खासदार असोत, सर्रास विकले जात असले तरीही जनता हीच या देशाची खरी ताकद आहे. पांडवांच्या मागेही तीच ताकद अडचणीच्या वेळी उभी राहिली.
आता भाजपाविरोधकांच्या बाजूने देखिल तीच जनता वेगाने संघटीत होत आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर देखील भाजपाला फारसा जल्लोष करता आला नाही, हे कशाचं लक्षण आहे?
सोशल मीडियावर भाजपची ट्रोल आर्मी शेपटी घालून का बसली आहे? पेकाटात लाथ बसल्यानंतरही जागच्या जागी गुरगुरण्याची मजबुरी त्यांच्यावर का आली असेल? इतिहासात कधी नव्हे तो राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजयाचा इव्हेंट करण्याची केविलवाणी वेळ त्यांच्यावर का यावी?
उत्तर प्रदेशात योगी सरकार येऊन जेमतेम तीन महिने झाले असतील. तेवढ्यातच दोन दोन मंत्र्यांनी बंडाचा झेंडा कसा काय उभारला? योगी सरकारवर जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची हिम्मत बंडखोरांनी कशी काय केली?
वरिष्ठ पातळीवरून कुणाचातरी पाठींबा असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नसतात. मात्र भाजपमधे यापूर्वी एवढ्या सहजपणे अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत!
जशी दुर्योधन, दुःशासनाची गफलत झाली, तशीच भाजपा नेतृत्वाची देखील गफलत होते आहे. काही भुरट्या लोकांना खरेदी केलं म्हणजे साऱ्या जनतेला खरेदी करता येते, हा भ्रम त्यांना झालेला दिसतो.
रेडिमेड गुळाची ढेली दिसली म्हणजे माशा गोळा होणारच! पण गुळाची ढेली म्हणजे उसाचा मळा नव्हे, तसंच गोळा झालेल्या माशा म्हणजे सैन्य नव्हे, याचीही जाणीव या लोकांना असायला हवी!
मुळात कौरवांच्या किचन कॅबिनेट मध्येच आता भांडणे सुरू झाली आहेत. याची खुर्ची ओढून घे, त्याचे फोटो उडव असले प्रकार आता लपून राहिलेले नाहीत.
परिवार आणि टोळी ह्यात मुलभूत फरक असतो. परिवारात सुरू झालेली भांडणं सामंजस्याने मिटवली जाऊ शकतात. टोळी मधील भांडणं मात्र जीवघेणी ठरतात, टोळीयुद्धाला आमंत्रण देतात.
अशा युद्धातून जर कुणाचे एन्काऊंटर झालेच तर जनतेला आनंद होत असतो. टोळी युद्धात मरणारासाठी समाज कधीही रडत नसतो!
देश अराजकाच्या दिशेनं जात असला तरीही मी निराश नाही. माझा या देशातील जनतेवर विश्वास आहे. तिच्या सहनशीलतेची मला कल्पना आहे. त्याचप्रमाणे तिच्या उद्रेकाची देखिल मी कल्पना करू शकतो.
सर्वसामान्य जनता ही सत्तेपेक्षा सेवा आणि समर्पण याचीच पूजा करते, याचीही मला खात्री आहे! सत्तेच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या गर्दीलाच संपूर्ण देश समजण्याची चूक कोणत्याही राजकारण्याने करू नये, अन्यथा त्याला मातीत जायला वेळ लागणार नाही!
लबाडी, बेइमानी, नीचपणा, मीडियाला पैसे देऊन छापून आणलेल्या बातम्या यावर काही काळासाठी जनता भुलत असली, तरी त्यातला पोकळपणा खुद्द फितुरांच्या म्होरक्याला माहीत असतो.
त्यामुळे बाहेर कितीही आव आणला, तरी ही टोळी आतून घाबरलेली असते. अस्वस्थ असते. भयभित असते. मानसिक बिमार झालेली असते. त्यामुळे ती कुणावरही विश्वास ठेवत नाही. सख्खा बापही त्यांना सगा वाटत नसतो.
म्हणूनच एखाद्या सेनापतीला चक्क चौकिदाराच्या जागेवर केव्हा उभे करतील किंवा कोणत्या घोड्याचा खोगीर साफ करायला लावतील याचा नेम नाही! काल मिशीला पिळ देणाऱ्या सरदारावर आज कुणाची दाढी खाजवून देण्याची पाळी येईल, याचा भरवसा राहिला नाही!
सोनिया गांधी असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा इतर विरोधक असोत, त्यांना त्यांच्या हक्काची पाच गावं सुद्धा शिल्लक ठेवायची नाहीत, अशी भाजप नेत्यांची खुन्नस आहे. त्याच सूडभावनेमुळे भाजपा नेतृत्व आंधळं झालेलं आहे.
त्यांची स्वतःची पापंच एवढी आहेत, की त्यामुळे स्वतःच्या सावलीची सुध्दा त्यांना भीती वाटते. म्हणूनच कोणताही विरोधक जीवंत राहता कामा नये, यासाठी ते जिवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे!
माणसं येतात, जातात, माणसं मरतातही! पण त्याचवेळी अन्यायाच्या विरोधात आणि मानवतेच्या रक्षणासाठी एल्गार करणारा सेनापतीही पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो!
कधी तो कृष्ण असतो, कधी बुध्द असतो, कधी गांधी असतो, तर कधी त्याचं नाव आंबेडकर असते! काळ बदलतो, लढाई बदलते, तशी सेनापतींची नावंही बदलतात.
सैतानी सत्तेच्या विरोधात मानवतेची लढाई मात्र सुरूच असते! अखंड सुरू असते! तेव्हा.. आपण अपराजेय आहोत, या भ्रमात दुर्योधन, दु:शासनाने कधीही राहू नये, यातच शहाणपणा आहे! असो..!
तूर्तास एवढंच..!
–
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर 9822278988
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- पंजाबराव कदम ते भाऊसाहेब देशमुख भारतीय देशाचे पहिले कृषिमंत्री
- आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली…
- ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही
- आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला…
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir