मंडळी राजकारणामध्ये अनेक नेते एकमेकांची नक्कल करतांना आपण बघत असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मा. अमोल मिटकरी असो. असे अनेक नेते भाषणादरम्यान किंवा संवाद करत असताना एकमेकांची नक्कल करून एकमेकांची खिल्ली उडवताना आपल्याला दिसतात. मात्र दिनांक २२ डिसेंबर २०२१ ला विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या नक्कलेवरून चांगलाच गदारोळ झाला. एकीकडे दिल्लीमध्ये विरोध पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाची मागणी सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षातील आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली .
विधानसभेमध्ये राज्यातील वीज कापणी संदर्भात चर्चा सुरू असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही विधानांचा संदर्भ देत म्हणाले की, \” मा. पंतप्रधान मोदी साहेबांनी म्हटलं होतं की परदेशात असलेला काळा पैसा देशात परत आणू. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये टाकू.\” परिणामी यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देतांना कमालच केली. ते म्हणाले की, \” मोदीसाहेब अस म्हणालेच नाहीत.\” यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हस्तक्षेप करतांना मा. पंतप्रधान मोदी साहेबांची नक्कल केली आणि म्हणाले की,\” २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी १०० वेळा म्हणाले आहेत की \’ काला धन लाने का की नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहा रखने का? यू ही रखने का\’ अस ते बोलले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली.
मोदी साहेबांची नक्कल दिसली पण छत्रपती शिवरायांची विटंबना नाही दिसली फडणवीस साहेब?
मंडळी छत्रपती शिवरायांच्या अस्मितेचा वापर भारतीय जनता पक्ष नेहमी राजकारणापुरताच करताना दिसतो. कारण त्यांना शिवरायांपेक्षा मोदीसाहेबांची अस्मिता महत्वाची वाटते. हे काल विधानसभेत फडणवीसांच्या वर्तवणूकीवरून दिसून आलं. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवरायांच्या झालेल्या बदनामीवर देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मात्र विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांनी मोदी साहेबांची नक्कल केली तर बेंबीच्या देठापासून ओरडून फडणवीस साहेब त्यांचा निषेध करत होते. आपल्या भाषणामधून फक्त शिवरायांच नाव घेणं हा त्यांचा राजकीय जुमला असतो हे लोकांच्या चांगलंच लक्षात आलं आहे.