दीड वर्षा पूर्वी शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे विरुद्ध उध्दव ठाकरे संघर्षात शिवसेना कोणाची, ह्या वादाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारा पक्ष म्हणजे शिवसेना” असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. तर आमदार अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होता. पण घटनात्मक मर्यादा राखत, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देण्याचे ठरवले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन विधानसभा अध्यक्षांना दिल्या आणि त्या गाईडलाईन नुसार विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित होते.
अश्या सर्व खटाटोपा नंतर अखेर आमदार अपात्रता निर्णयाची 10 जानेवारी ही तारीख ठरली. सायंकाळी साडेचार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. पण प्रत्यक्षात त्यांनी निकाल वाचन न करता निकालाचे सारांश वाचन केले.
निकालाची वैशिष्ट्ये
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये आपण बघू;
1) शिंदे गट हाचं मूळ शिवसेना आहे.
2) भरत गोगावले हेचं मुख्य प्रतोद आहेत.
3) पक्षाच्या बैठकीला जर एखादा नेता उपस्थित नसेल तर, त्याला पदावरून बरखास्त करणे, हे पक्षांतर्गत लोकशाहीला धरून नाही.
4) शिवसेनेच्या दोघं गटांचे आमदार अपात्र नाहीत.
5) शिंदेंची भारतीय जनता पक्षासोबत सांगड आहे. याचे कोणतेही पुरावे नाही. हे फक्त आरोपचं आहेत.
7) शिवसेना पक्षाची 1999 ची घटना हीच अंतिम असेल. कारण पुडच्या घटनादुरुस्त्या निवडणूक आयोगाला मिळालेल्या नाहीत.
असे काही ठळक मुद्दे निकाल वाचनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिरेखीत केले.
निकलाचे थोडक्यात विश्लेषण
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निकाल वाचन जसे जसे पूर्णत्वाकडे जाऊ लागले. तश्या लोकांच्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून उमटायला सुरुवात झाली. कोणी शिंदेंच्या बाजूने तर कोणी ठाकरेंच्या बाजूने स्वतःची प्रतिक्रिया देत होते. पण निकालाचा मुख्य सारांश हा पक्षपाती आहे हे उघड.
कारण, मुख्य राजकीय पक्ष हा उध्दव ठाकरेंचा आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. मग अश्या वेळी एकनाथ शिंदे हे उध्दव ठाकरेंना सोडून 16 आमदार घेऊन सुरतला गेले आणि मोबाईल बंद करून ठेवला, याला काय म्हणावे? शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्याचा आदेश असेल, की आपल्याला भाजपा सोबत युती करून सरकार स्थापन करायचे नाही. तरी एकनाथ शिंदे भाजपा सोबत सरकार स्थापन करतात. मग ह्याला पक्षविरोधी कारवाई का नाही म्हणायचे?
राहुल नार्वेकर म्हणतात, एकनाथ शिंदे आणि भाजप यांची काही मिलीभगत नाही. किंवा याचे काहीही पुरावे नाहीत. मग एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते. त्यावेळी शिंदे समर्थक आमदार, गोव्याला हॉटेलमध्ये टेबलावर चढून लहान मुलाप्रमाणे नाचत होते, असा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. हा पुरावा राहुल नार्वेकर यांनी का मानू नये? किंवा हा पुरावा पुरेसा नाही का?
सर्वोच्च न्यायालयाने, विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता सुनावणीसाठी काही निर्देश दिले होते, जे की सक्तीचे होते. त्यात एक निर्देश असा होता की, शिवसेना कोणाची? यावर दिलेल्या निवडणूक आयोगाच्या निकालाचे कोणतेही दडपण किंवा आधार घेण्याची गरज नाही किंवा तसे करू नये. पण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक निखिल वागळे म्हणतात त्या प्रमाणे, राहुल नार्वेकर यांनी निकाल तयार करताना, पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतलेला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालावरूनचं शिवसेना कोणाची? आणि मुख्य प्रतोद कोण? याचे उत्तर दिलेले दिसते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल काही वेळासाठी आपण 100% निष्पक्ष आहे असे समजू. मग पक्षांतर बंदी कायद्यानुसार, शिंदे किंवा ठाकरे यांच्यापैकी एक गट अपात्र व्हायला हवाच होता. पण दोघं गट पात्र ठरले, मग याचा अर्थ काय? किमान ठाकरे गट तरी अपात्र व्हायला होता. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे, की निकाल हा पक्षपाती आहे.
त्यानंतर सुनील प्रभू यांचा व्हीप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अमान्य केला. प्रभू यांनी दिलेला व्हीप अमान्य करण्याचे कारण काय? तर त्यांनी व्हीप वर केलेली सही चुकीची आहे. पण सुनील प्रभूंनी सुनावणी दरम्यान उलट तपासणी वेळी एक बाब वारंवार सांगितली की, “मी नेहमी दोन सह्या करतो. मात्र, आजपर्यंत विधिमंडळ कामकाजात एकच सही केलेली आहे. काही शंका असल्यास त्याची तपासणी करावी.” तरी सुद्धा सुनील प्रभू यांचा व्हीप अमान्य करण्यात आला.
असे अनेक मुद्दे आहेत की, ज्यावरून 16 आमदार अपात्रता निकालाची पक्षपाती असण्याची शंका येते. ते आपण येत्या काही लेखांमध्ये बघणार आहोत. लोकशाही वाचवण्याचे ढोंग करताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लोकशाहीचा आणि महाराष्ट्राच्या तमाम मतदारांचा विश्वासघात केलेला आहे. यावर तुम्ही सहमत आहात का? तुमची प्रतिक्रिया Political Wazir वर नक्की नोंदवा.