
साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है* हा डायलॉग ऐकला की, चाटदिशी एक चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, अर्थातच तो नाना पाटेकरांचा.
क्रांतीवीर, तिरंगा, नटसम्राट अश्या अगणित चित्रपटाद्वारे उत्कृष्ठ अभिनयाची एक आदर्श रेषा नानांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये घालून दिली.
मात्र गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर जरा वेगळ्याच कारणामुळे प्रसार माध्यमांचा केंद्रबिंदू बनलेले आहेत.
मागच्या 10 दिवसात नानांनी दोन राजकीय विधाने केली.
पहिलं विधान म्हणजे, “आगामी निवडणुकीत भाजपला 350 ते 375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल. भाजप देशात उत्तम काम करत आहे, त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही”, आणि दुसरं विधान म्हणजे “राजकरणात सातत्य ठेवणारी माणसे कमी आहेत. त्यातही देवेंद्र फडणवीस हे म्हणजे मुद्देसुद बोलणारे व्यक्ती आहेत”.
पहिलं केंद्रातल्या भाजप नेतृत्वासाठी आणि दुसरं महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वासाठी, नानांनी काढलेले हे कौतुकोद्गार आहे.
आता ह्यावरून सर्वांनाच प्रश्न पडला असेल, की नानांनी ही वक्तव्य करण्यामागचं कारण नक्की काय?
आता हा विषय जरा सुरुवाती पासून समजून घेऊ.
ते असं आहे की, नाना पाटेकर अभिनेते असले तरी नानांची राजकीय जाणीव तशी भक्कम आहे. कारण त्यांची शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या सोबतची असलेली जवळीक आपल्या वडिलांच्या पिढीने बघितलेली आहे. अगदी नाना स्वतः सांगतात त्याप्रमाणे, “अरे गाढवा, कसा आहेस? असं म्हणतं बाळासाहेब नानांच्या गळ्यात हात घालुन जवळ ओढायचे”.
बाळासाहेब दिवंगत झाल्या नंतर नानांची जवळीक पवार काका – पुतण्यांसोबत अगदीच वाढली. ती इतकी वाढली की, अजित पवारांच्या धरणाच्या वादग्रस्त विधानावरून, नाना जाहीर भाषणात कोपरखिळी मारून, दादांची मस्करी घेतात आणि अजित दादा देखील त्याला मनमोकळा हसून प्रतिसाद देतात. याचे व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलेले असतीलच.
अश्यातच नाना पाटेकर आता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ह्या जोडीचे कौतुक करता आहेत. ह्या वरून नानांचा राजकीय चाणाक्षपणा लक्षात येतो. तो असा की, बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंब, यांच्या आजूबाजूला महाराष्ट्रातील राजकारण फिरत असल्याचे आपण बघितले आहे. तर सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पुढे येत आहेत. अश्या ठराविक परिस्थीत, ठराविक नेत्यांच्या जवळ जाऊन आपले वयक्तिक हित साध्य करून घेण्याचा नानांचा कल असू शकतो, असे म्हणता येऊ शकते.
मग प्रश्न असा निर्माण होतो की, अशा राजकीय चाणाक्षपानातून नाना कोणते हित साध्य करू शकता?
तर आपण बघतो की, महाराष्ट्रात मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटाला अधिक पसंती मिळत असते. अशा वेळी मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याचा परिणाम त्या चित्रपटाच्या अर्थकारणावर होतो. मग आपले राजकीय संबंध जर भक्कम असतील तर थिएटर मिळण्यासाठी सोईचे होते, हा झाला एक फायदा.
दुसरा फायदा म्हणजे, नाना पाटेकरांच्या “नाम फाउंडेशनचा”.
नाम फाउंडेशन ही ग्रामीण भागात कार्य करणारी एक सामाजिक संस्था आहे. कोणतीही सामाजिक संस्था यशस्वीरित्या चालवण्यासाठी राजकीय हितसंबंध फायद्याचे ठरतात. संस्थेला येणाऱ्या आर्थिक अडचणी, स्थानिक कामात लागणारे राजकीय सहकार्य, परदेशातून मागवावी लागणारी मदत अशा अनेक कारणांमुळे राजकीय हितसंबंध उपयोगात येतात.
तसेच तिसरे आणि सर्वात महत्वाचे हित म्हणजे नानांना लागलेले आमदारकीचे वेध. काही दिवसांपूर्वी भाजपाने सिनेसृष्टीतल्या माधुरी दिक्षित यांना लोकसभा आणि नाना पाटेकर यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रस्ताव दिला होता. आता ह्या प्रस्तावाचे पुढे काय झाले हे समजू शकलेले नाही.
पण नानांनी खडकवासला मतदार संघामधून निवडणूक लढविण्याची ईच्छा अनेकदा अजित पवारांकडे खासगीत बोलताना व्यक्त केलेली आहे, असे राजकीय जाणकार सांगतात. तसेच खडकवासला येथील घेरा सिंहगड भागात नाना पाटेकरांची शेती आणि फार्म हाऊस आहे. त्या निमित्ताने नाना आपला बराच फावला वेळ ह्या फार्म हाऊस वर घालवतात.
आता ह्या दोन राजकीय विधनांमुळे नाना पाटेकर भाजपच्या किती जवळ जातील? आणि नानांचा राजकीय चाणाक्षपणा भाजपासमोर किती कारगर ठरेल? ह्या प्रश्नाचं उत्तर येणारी वेळच देईल. तथापि ह्या मुद्यावर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.