मुख्यमंत्री विनोद तावडे?
रविवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना, एका पत्रकाराने “पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवण्या बाबत” प्रश्न विचारला असता. त्यावर विनोद तावडे यांनी “तुम्ही मी मुख्यमंत्री होईल का?” असा प्रश्न का विचारात नाही? असे मिश्किल अंदाजात उच्चारले.
पण खरचं विनोद तावडे मुख्यमंत्री होऊ शकतात का? तर हा प्रश्न तसा रास्तच आहे. कारण एक, विनोद तावडे हे मराठा चेहरा आहेत. ज्यामुळे भाजपाला राज्यातील मराठा समाजाला सोबत घेणे सोईचे जाईल. तसेच “ब्राम्हणवादाला पुढे रेटणारा पक्ष” ह्या टीकेला भाजप तावडेंच्या माध्यमातून खोडून काढू शकतो.
दोन, उत्कृष्ठ संघटन कौशल्य आणि प्रभावी रणनीतीकार याच्या जोरावर, भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस या महत्वाच्या पदाची जबाबदारी विनोद तावडे यांनी मिळवली. विशेष म्हणजे याआधी दिवंगत प्रमोद महाजन हे एकमेव नेते भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बसलेले होते. तावडेंचे कौशल्य पाहता, त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी – शहा यांचे दौरे ठरवण्याची आणि 2019 साली भाजपा ज्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होती, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तेथील उमेदवार निश्चित करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. एकूणच यानुसार मोदी – शहा यांचा तावडेंवर भक्कम विश्वास असल्याचे दिसते.
तीन, स्वच्छ प्रतिमा असणारा नेता. सध्या महाराष्ट्र भाजपचे नेते कोणत्या न कोणत्या वादात अडकलेले दिसतात. मग बावनकुळेंचे कॅसिनो प्रकरण असेल, चंद्रकांत पाटलांवर वारंवार होणारी शाईफेक किंवा त्यांच्या दौऱ्यांना होणार विरोध असेल, किंवा देवेंद्र फडणवीसांवर शिवसेना-राष्ट्रवादी फोडल्याचे आरोप आणि 2019 च्या पाहटेच्या शपथविधिमुळे ओढवून घेतलेली वरिष्ठांची नाराजी असेल. पण त्याचवेळी ABVP पासून सुरुवात करणाऱ्या तावडेंचा प्रवास हा कायमचं चढता राहिलेला आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप विनोद तावडे यांच्यावर नसल्याने, भाजप हायकमांड तावडेंना पुढे करू शकते.
चार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपल्या आधीच्या पक्ष्यात बंड करून सत्तेत बसल्याने, आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने त्यांच्या विरोधात मोठा मतप्रवाह आहे. तसेच नेहमी प्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणारी सत्ता विरोधी लहर. आणि महत्त्वाचे म्हणजे शिंदे – पवार समीकरण दीर्घकालीन चालणारे आणि टिकणारे नाही याची जाणीव भाजपाला चांगलीच आहे. म्हणून अशा ठिकाणी विनोद तावडे परफेक्ट बसताना दिसतात.
पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ABVP द्वारे राजकारणाची सुरूवात करणारा, RSS च्या मुशीत तयार झालेला, पक्षासाठी अडचणीच्या काळात धावून येणारा विश्वासू अशी विनोद तावडे यांची ओळख.
यांसारख्या कारणांमुळे विनोद तावडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात. पण विनोद तावडेंना 2018 साली मंत्री पदावरून बाजूला सारण्यात आले होते. तसेच 2019 साली पक्षाने त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारले होते, हे देखील विसरून चालणार नाही. तसेच “देवेंद्र फडणवीस हे देखील मुत्सुद्दी, अभ्यासू आणि भविष्याचा वेध घेणारे नेते,” मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विनोद तावडेंसमोर असतील, यात कोणतीही शंका नाही.
यावर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.