आंदोलन, प्रदर्शन, मोर्चे, सभा म्हंटल की विरोध हा होतोच. कारण अश्या बाबतीत दोन विचार प्रवाह असतात, एक बाजूने तर दुसरा विरोधात. हा विरोध वैचारिक असेल तर फारच उत्तम. पण विरोधाचे रूपांतर दडपशाहीत होत असेल, विरोध दडपण्यासाठी हुकूमशाही मार्गाचा अवलंब होत असेल तर हे आपल्या लोकशाहीसाठी घातकच आहे.
हे सांगण्याच कारण असं की, 30 डिसेंबर रोजी नीहाल पांडे यांना मुंबईमध्ये मशाल मोर्चा काढायचा आहे. पण एकनाथ शिंदे सरकारने ह्या मशाल मोर्चासाठीचा परवानगी अर्ज फेटाळून लावला.
आता सरकारचं कृत्य चुकीचं कसं आहे हे बघू?
निहाल पांडे हा सर्वसामान्य घरातील तरुण, रामटेक नागपूर येथे हातात भगवा ध्वज घेतो. हा भगवा ध्वज महाभारत यात्रेच्या माध्यमातून मुंबईला चालत घेऊन जातो आणि उध्दव ठाकरे यांच्या हाती देतो.

महाभारत यात्रेद्वारे निहाल पांडे यांनी गावागावात जाऊन, गोरगरीब जनतेचे प्रश्न जाणून घेतले, त्यांच्या समस्यांवर उपाय काय असू शकतात? ते शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून गद्दारी कशी केली? हे सांगत गावातील आणि शहरातील लोकांना शिंदे-फडणवीस यांच्या अनैतिक राजकारणाची जाणीव करून दिली.
तसेच गावागावातील तरुण शिवसैनिकांच्या हृदयातील अन्यायाच्या विरुद्ध भावना प्रज्वलित करून, त्याविरुद्ध लढण्यासाठी नवसंजीवनी दिली.
निहाल पांडे यांची युवक, महिला, शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी, काही तर उचित काम करून दाखवण्याची, तळमळ इतकी वाढली की उध्दव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांनी सुद्धा निहाल पांडे यांच्या कामाची दखल घेऊन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तुम्हाला आचार्य वाटेल, पण उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असताना, त्यांनी निहाल पांडे रस्त्यावर अभिवादन करण्यासाठी थांबलेले आहेत हे बघून, आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला आणि निहाल पांडे यांचे अभिवादन स्वीकारले. यावरून एक गोष्ट नक्की आहे की, तुमचा हेतू प्रामाणिक असेल आणि हेतू साध्य करण्यासाठी मनापासून कष्ट करण्याची तयारी असेल, तर देव सुद्धा त्याची दखल घेतो.
थोडक्यात, निहाल पांडे आज शेकडो लोकांसाठी आशेचा किरण आहेत. कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढण्याची धमक आज त्यांच्यामध्ये आहे.
सर्वसामान्य जनतेची ईच्छा आणि सरकार काढून त्यांच्यावर होणारा अन्याय बघता. निहाल पांडे यांनी पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी वर्धा ते मुंबई अशी निष्ठा यात्रा सायकलवर काढण्याचा निर्णय घेतला.
निष्ठा यात्रा 23 डिसेंबर रोजी वर्धा येथून सुरू झाली असून 30 डिसेंबरला मुंबईत पोहचेल.
महागाई-बेरोजगारी, महाराष्ट्रा बाहेर चाललेले उद्योग, शेतकऱ्यांच्या व्यथा, बेहाल झालेली आरोग्य व्यवस्था, घरकुल योजनेचा उडालेला बोजवारा असे अनेक मुद्दे घेऊन निहाल पांडे यांची निष्ठा यात्रा निघालेली आहे. तसेच यात्रेदरम्यान समाजातील विविध प्रश्न उलगडत चालले आहेत.
अशा विविध प्रश्नांच्या गांभीर्याची जाणीव, निहाल पांडे यांना मुंबईत मशाल मोर्चाद्वारे सरकारला करून द्यायची आहे. पण सरकार यासाठी परवानगी देत नाही.

वास्तविक पाहता संविधानाच्या कलम 19 आणि 21 द्वारे लोकांना शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवण्याचा तसेच आपल्या मागण्या सभा,मोर्चे, आंदोलने यांच्या माध्यमातून सरकारसमोर ठेवण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचे पालन करण्यास शिंदे सरकार आडकाठी आणत असेल, तर हे कृत्य नक्कीच हुकूमशाही स्वरूपाचे आहे. त्याहीपलीकडे निहाल पांडे हे हजारो लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला भेटू इच्छितात, तर सरकारने निहाल पांडे यांना भेटण्याची तसदी घेतलीच पाहिजे. तसेच याचा दुसरा अर्थ म्हणजे निहाल पांडे यांच्या कामाची एकनाथ शिंदे यांना भीती वाटत असावी, त्याशिवाय निहाल पांडेंचा मशाल मोर्चा थांबवण्याचे दुसरे कारण नाही.
आता शिंदे सरकारच्या हुकूमशाहीला न जुमानता निहाल पांडे सामान्य जनतेच्या मागण्या कशा पद्धतीने सरकार समोर ठेवतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कार्याला आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. आपण आपली प्रतिक्रिया नोंदवून आपला पाठिंबा दर्शवू शकता.