निष्ठावंत निहाल – गद्दारांच्या छाताडावर शिवसेनेची निष्ठा

महाराष्ट्र म्हणजे अनेक स्वातंत्र्य योध्ये, क्रांतिकारी, जन चळवळींचे माहेरघर. भारताची वैचारिक घडी बसवणारे, विविध वैचारीक आघाड्यांना आपल्यात सामावून घेणारे, आध्यात्मिक परंपरा जोपासणारे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्राची ही परंपरा अनेक तरुण आपापल्या परीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात.
आज आपण अश्याच एका तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत. निहाल पांडे त्यांचं नाव.

निहाल पांडे हे वर्धा येथील आहेत. महिलांच्या, युवकांच्या आणि वर्ध्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आणि त्या प्रश्नांवर उत्तर मिळेपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका घेणार हा तरुण वर्ध्यातील जनतेसाठी आशेचा किरण बनला आहे. वर्धा परिसरात युवकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, महिला बचतगटांच्या काही अडचणी असतील, घरकुल / बेघरांचे प्रश्न असतील, कोणाचे काही कार्यालयीन कामे असतील अश्या प्रत्येक ठिकाणी पुढाकार घेऊन सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न निहाल पांडे करत असतात.

“युवा… परिवर्तन की आवाज” या त्यांच्या संस्थेमार्फत, विविध समाज उपयोगी कामं निहाल पांडे करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील सातगाव येथील बेघर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निहाल पांडे यांनी काढलेली पदयात्रा, सातगाव परिसरातील असंख्य कुटुंबांना आधार देणारी ठरली. नागपूर आणि वर्धा परिसरातील महिला बचतगटांना विविध सोई सुविधा वेळेवर पुरवाव्यात, यासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढून,घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न शेकडो महिलांनी केला होता. तेव्हा त्या मोर्चाचे नेतृत्व निहाल पांडे यांनी केले होते.

हे सगळे असले तरी, निहाल पांडे यांच्यावर प्रामुख्याने शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा असून ते माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यशैलीने प्रभावित आहे. निहाल पांडे संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश झोतात तेव्हा आले, जेव्हा त्यांनी महाभारत यात्रा काढली. ही यात्रा नागपूरच्या रामटेक येथून मातोश्री मुंबई पर्यंतची होती. महाभारत यात्रेचे उद्दिष्ट म्हणजे लोकशाही मूल्यांच्या विरुद्ध होत असलेल्या राजकारणाचा निषेध आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर सामान्य जनतेचा पाठिंबा उध्दव ठाकरे यांना मिळवून देणे हे होते. या यात्रेत लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तसेच यात्रेची दाखल महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख प्रसार माध्यमांनी घेतली होती.

पण सध्या चर्चा आहे ती निहाल पांडे यांच्या “निष्ठा यात्रेची”. ही यात्रा 23 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा येथून मार्गस्थ झाली आहे. युवकांच्या, महिलांच्या आणि सामान्य जनतेच्या गावागावांत भेटी घेऊन जनजागृती करत ही यात्रा 31 डिसेंबर रोजी मातोश्री मुंबई येथे पोहचणार आहे. ह्या यात्रेचा मुख्य हेतू बेरोजगारी, महागाई, आरोग्याच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल योजनेचा बोजवारा अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणे असा आहे. तसेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाताय म्हणून महाराष्ट्र हवालदिल झालंय आणि सरकार दिल्लीवारी करण्यात व्यस्त आहे असे अनेक मुद्दे घेऊन सध्याचे शिंदे – फडणवीस – पवार सरकार जनतेवर कसे अन्याय करते आहे आणि त्या तुलनेत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे चांगले होते, अशी जनजागृती करत महाभारत यात्रा निघाली आहे.

तथापी विविध यात्रा, जनआक्रोश मोर्चे, आंदोलने यांच्या माध्यमातून निहाल पांडे सर्वसामान्य जनतेचा आवाज बनत आहेत. हा आवाज भविष्यात विधानसभेत गाजतो की नाही, हे येणारी वेळच सांगेल.

आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *