हा कुणी माणूस नाही कुठलीही स्त्री नाही पण रोज एकाच वेळी लाखो लोकांचे जीव घेऊ शकतो आणि घेतोसुद्धा.रोज लाखो लोकांना तजवतो, मूर्ख बनवतो.आधी मानसिक अत्याचार करतो आणि मग मोठ्या शातीरीने तुमचा खून करतो. कुणाला कानोकान खबरही लागू देत नाही,
याला कोणताही पोलीस अटक करू शकत नाही, कोणताही वकील ह्याच्याविरुद्ध मुकदमा चालवू शकत नाही,
ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारची दया नाही. हा लहान मुलांना मारतो , कुणाची बहीण , कुणाचा भाऊ , कुणाची माय, कुणाचा बाप ह्याला काही घेणं देणं नाही आणि खून करायची ह्याची वेगळीच तरकीब आहे. तुमच्याच घरी येतो ,तुमच्या टीव्हीमध्ये येतो, वर्तमानपत्रामध्येसुद्धा. पण तुम्ही याला ओळखू शकत नाही. अरे तुम्हीच काय ह्याला कुणीच ओळखू शकत नाही, हा रोज लाखो लोकांचे खून करतो आणि स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीही देतो. तुम्ही त्याला ओळखूनही त्याच्या अज्ञात आहात. हा अमर आहे. ह्याला तुम्ही जर मारल नाही तर हा कधीच मरणार नाही.
हा.पण काही कालावधीन तो वेष बदलून दुसऱ्या माणसांच रूप घेतो आणि मग पुन्हा खून करतो तुमचा , तुमच्या स्वप्नांचा, तुमच्या कुटुंबाचा. विदर्भामध्ये आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीनं एसटीच्या पाससाठी बापाकडे पैसे नाही म्हणून जीव दिला ती आत्महत्या नव्हती,
धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यान मंत्रालयात जाऊन विष घेऊन दिलेला जीव आत्महत्या नव्हती, नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर मधल्या शेतकऱ्याकडे मार्केटमधून घरी जाण्यासाठी पैसे नाही म्हणून दिलेला जीव आत्महत्या नव्हती, सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावच्या मुलांन सांगितलं की \’माझ्या बापान गळफास घेऊ नये म्हणून मी रात्रभर बापाच्या बाजीचा ठाव्वा पकडून बसलो होतो \’ , ही मानसिक आत्महत्या नव्हती, उत्तर प्रदेशमध्ये सायकलच्या दोन दांड्याच्या मध्ये बायकोचा मृतदेह घेऊन जाताना हतबल झालेला माणूस, ज्या देशामध्ये तीन हजार कोटी रुपयांची मूर्ती आहे त्याच देशात बेड आणि ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून नवऱ्याला तोंडातून श्वास देणारी बायको, निवडणूकीच्या वेळेस जातीवादावरून होणारी समाजाची आत्महत्या, कर्जमाफीवरून होणारी शेतकऱ्यांची आत्महत्या ,अंधश्रद्धेविरोधात एल्गार पुकारणाऱ्या दाभोळकर ,पानसरे कलबुर्गीचा गेलेला जीव,
उत्तर प्रदेशमधल्या नद्यांमध्ये वाहणारे तुमच्याच आप्तीकांच्या प्रेतांचे ढीग, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा आंदोलनामध्ये जाणारे जीव ,जामिया जेएनयूसारख्या विद्यापीठांवर होणारे हल्ले , नोटबंदीच्या रांगेमध्ये गेलेले निर्दोष लोकांचे जीव, उद्या तुमचाही नंबर लागू शकतो कारण हा सिरीयल किलर दर पाच वर्षांनी वेष बदलतो तोही तुमच्याच हातून ,म्हणून
सावधान राहा …