शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस – माढ्याचं रणकंदन

Madha Loksabha

महाराष्ट्राच्या राजकारणाचे रंग दिवसागणिक बदलताना दिसत आहेत. त्यातच शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्या चुरशीचा एक अध्याय 16 जानेवारीला फलटण येथे बघायला मिळाला. निम्मित विकास कामांच्या भूमिपूजनाचं होत. पण टोले मात्र शरद पवार यांना लगावले गेले. ह्या मुद्याचे सविस्तर विश्लेषण आपण ह्या लेखात बघणार आहोत.

नीरा देवघर प्रकल्प; धोम बलकवडी जोड कालवा; नाईकबोमवाडी MIDC जमीन हस्तांतरण आणि फलटण बारामती रेल्वे लाईन ह्या तीन मुख्य विकास कामांच्या भूमिपूजनाचा वचनपूर्ती सोहळा फलटण(सातारा) येथे पार पडला.

कार्यक्रमाची महत्वाची रूपरेषा होती की, माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या परिसरातील दुष्काळ कमी होऊन त्या भागाचा विकास व्हावा. ह्या विकासकामांचा मुख्य फायदा जरी फलटण आणि आसपासच्या परिसरापुरता मर्यादित असला तरी, याची मार्केटिंग संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघात केली गेली.

याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, बारामती प्रमाणे माढा देखील शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. येत्या 2024 लोकसभा निवडणुकीत पवारांचा हा बालेकिल्ला पुन्हा एकदा आपल्याकडे राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 2014 ते 2019 हा मतदारसंघ विजसिंह मोहिते – पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडे होता.

मात्र 2019 साली काँग्रेस मधून भाजपात गेलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाकर यांना भाजपाने उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी काढून संजय मामा शिंदे यांना तिकीट देण्यात आले. माढा पवारांचा बालेकिल्ला असल्याने, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढाई चुरशीची बनवली आणि यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला.

माढ्यात सध्या वर्चस्व कोणाचं?

माढा लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. करमाळा – संजय शिंदे (अपक्ष – अजित पवार गट) ;
माढा – बबनराव शिंदे (राष्ट्रवादी – भूमिका स्पष्ट नाही ) ;
सांगोला – शहाजी बापू पाटील (शिवसेना) ;
माळशिरस – राम सातपुते (भाजपा);
माण- जयकुमार गोरे (भाजपा);
फलटण – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

ह्या सहा विधानसभा मतदार संघा पैकी माढा अपवाद वगळता, बाकी पाचही आमदार सध्या महायुतीकडे आहेत. माढा अपवाद यासाठी की आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवार किंवा अजित पवार यांपैकी कोणत्या गटात जायचे याबद्दल अद्याप निर्णय घेतलेला नाही.

माढा लोकसभेसाठी भाजपची दिशा

शिंदे आणि पवार बंडानंतर, माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तीन आमदार महायुतीत गेले. त्यामुळे त्या 3 आमदारांवर गद्दारीचा शिक्का आहे. त्याची परिणती लोकसभा निवडणुकीत होऊन माढा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या हातून निसटायला नको, हा विचार सध्या भाजपा नेतृत्व करत असेल.

तसेच, माढा परिसरात शरद पवारांना मानणारा एक विशिष्ठ मतदार वर्ग आहे. त्या वर्गाला शरद पवारांपासून तोडण्याचा भाजपचा अट्टाहास मागच्या काही काळात बघायला मिळालेला आहे.

अश्या परिस्थितीत विकासकामांचा धडाका लावणे आणि आज वरची माढा मतदारसंघाची स्थिती शरद पवारांमुळे दुष्काळी होती, हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर 16 जानेवारीला झालेल्या वचनपूर्ती सोहळ्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा ओघ असाच काहीसा होता.

येत्या काळात, शरद पवार काय समीकरणे फिरवतात यावरच माढा कोणाकडे जाईल? याचे उत्तर मिळेल.

तत्पूर्वी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *