संभ कहैं सुनि दीन दयाल सो |
मेरी हँसी भए तेरी हँसी है |
~ छत्रपती संभाजी महाराज [ सातसतक]
या महाराष्ट्र च्या इतिहास चे संभाजी नावाचे एक असे पान आहे ज्याला लिहण्यासाठी शाई नव्हे तर रक्ताला पुढे यावं लागलं….!!
पण आजपर्यंत च्या प्रवासात एका गोष्टी ची एवढी भयंकर चिड होती की संघर्षाच्या पायदंडावर अविरत लढलेल्या शंभुछत्रपतींबद्दल एवढ्या वर्षात न लोकांना जाणायचं होतं , न शंभु कळवुन घ्यायचा होता..
नितीन बानूगडे च्या व्याख्यान अगोदर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे बदफैली आणि एका राष्ट्रपुरुषाच्या शब्दात बोललो तर मिनाक्षी आणि मदिराक्षी मध्ये गुंतलेला युवराज पलीकडे शंभुछत्रपती कुणाला माहितीच नव्हते…
पण त्यांचा अंत मात्र सर्वांना माहिती होता , बदनामी चे घात आयुष्यभर घालून धर्मवीर या शब्दात मात्र गर्वाने संघटना ,नाव वाढवण्यासाठी लोक उभे राहिले…
वा. सी बेंद्रेंनी शोधलेल्या शंभु वर तर खुद्द बाळशास्त्री हरदास सारख्या इतिहास अभ्यासकांनी एकांगी असल्याचे आरोप घातले , पुरंदरेंनी कवी कलश जवाबदार ठरवला आणि सरळ बोलुन दिले
” संभाजीराजांच्या ठायी शिवशाहीचा पोंच निर्माण झाला नव्हता…!! त्यांच्या वर्तनात अविवेकी उच्छुंखलपणाचं दिसून येते , या वेळी त्यांच्या हातुन काही आगळीक घडली असावी….!! “
कानिटकर पासून अनेकांनी पुढे सर्जा शंभु वर पारंपरिक आरोप लावायला तडजोड केलीच नाही…
तेवढ्यात कमल गोखले , विजयराव देशमुख ,जयसिंगराव पवार , केदार फाळके सारखे काही मंडळी शंभुछत्रपतींना खर्या अर्थाने पुढे आणण्यासाठी धडपडली …
ज्या शंभुछत्रपतींना एवढे वर्षे बदनाम करून सुद्धा त्यांच्या बलिदानाला कोणी लपवु शकले नाही तो.शंभु नेमका आहे काय ??
ज्याच्या नुसत्या नावाने शत्रूला कंप सुटतो , ज्याचा केवळ स्मरणाने शत्रूची रात्र आणि दिवस थरकापाने शहारली , ज्याच्या घोड्याच्या टापाखाली महाराष्ट्र उधळून उठल्याची नोंद खुद्द मनूची ने केली तो.शंभु म्हणजे राजकारण, समाजकारण, धर्मकारण या त्रिसूत्रात शोधताच येतो…
गृहकलह चे बळी पडले असतांना अणाजी पंताच्या गोठ्याने शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर लगेच शंभुछत्रपतींना कैदेत घालण्यासाठी घात टाकला असतांना वडिलांच्या दुख पचवून लगेच राजकारणात प्रवेश केला राजापूर ला माणसं पाठवून गड धान्यांनी परिपूर्ण केला , पन्हाळा वर बंदोबस्त वाढवला आणि गडातून एक पायही बाहेर न काढता सर्व स्वराज्य सुभेदारासह आपल्या बांजुंनी घेतले..
महाराष्ट्र मधून बंगाल ची सुत्रे हलली , दक्षिणेकडे चिक्कदेवरायचे सामर्थ्य जाणुन गोवळकोंडा चा सुलतान आणि इक्केरीच्या नायकाला आपल्या बाजूला करून दक्षिणेकडे मराठ्यांच्या पराक्रमी मेरु उभा करून चिक्कदेवराय तहासाठी गुडघ्यावर बसवला…
औरंगजेब भिडण्यासाठी आला असताना विजापूर घेण्यासाठी तो तयारी करत असतांना शंभुछत्रपतींनीच विजापूर च्या गडांवर हात टाकले…
फोंडा पोर्तुगीज पुढे टिकाव धरु शकणार नाही कळताच तो पाडून मर्दनगड उभा केला…
विजापूर आणि गोवळकोंडा च्या आदिलशाही आणि कुतुबशाही एकत्र घेऊन दक्षिणेची ढाल बनुन औरंगजेब ला भिडला..
राजकारणाच्या पलिकडे गेलो तर
‘” आबासाहेबांचे संकल्पीत तेच आम्हांस करणे अगत्य !! “
म्हणणारा शंभु सापडतो .
पोर्तुगीजांनी पोली आणि सिडकोली गाव लुटून उध्वस्त केली तेव्हा तिथल्या गरीब रयतेला मायेप्रमाणे जपणारा शंभु , जंजिऱ्याच्या सिद्दी आणि मुघलांनी कुलाबा उध्वस्त केल्यावर तिथल्या रयतेला पुन्हा वसवणारा शंभु ,वडिलांनी केलेल्या निवाड्यांना पुढे त्याच न्यायाने पुढे जाऊन अर्जोजी , गिर्जोजींचे निवाडे करणारा शंभु !!
या शंभुला धर्मवीर का म्हणावे ?
कारण औरंगजेब ने धर्म बदलण्यासाठी अट घातल्याचा कुठलाही उल्लेख आढळत नाही..
मग शंभुछत्रपती धर्मवीर नाही का? तर आहेच…
फोंडा च्या शिलालेख वर
” आता हे हिंदुराष्ट्र जाहले !! “
म्हणणारे शंभु , बुधभूषण मध्ये
” मृतो धर्मणे संयुक्तो दिर्घजीवी भविष्यती !! “
म्हणणारा शंभु…
रामसिंग ला ठणकावून
” आता त्या यवनाधमाला कैदेत टाकून आपल्या देवदेवतांच्या पुन्हा स्थापना करण्याचा !! “
शब्द टाकणारा शंभु !! जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात घेणारा शंभु धर्मवीर आहे पण फक्त नाही..
मात्र हा शंभु इतिहास ने दुर्लक्षित केला, करत राहिला आणि त्यांच्या त्या भयावह अंतावर काही क्षणासाठी शंभु आठवल्या जाऊ लागला…
पण शंभुछत्रपतींचं चरित्र एवढे परिपूर्ण आहे की आम्ही त्याला मांडण्यासाठी आपण अपुर्ण ठरतो…छत्रपतींचा इतिहास म्हणजे फक्त त्यांचा शेवट नाही , शंभुछत्रपती म्हणजे फक्त धर्मवीर आणि मृत्युंजय नाही , शंभुछत्रपती म्हणजे स्वराज्यरक्षक , मालिक ए हिंद…तरीही श्रापीत राजहंस
म्हणून अजूनही तो शंभु आम्हाला सातसतक मधून पुन्हा पुन्हा विचारतोच आहे…
” संभ कहै मेरी पति तुअ हात रहै !
मेरे मन इहै तुम बिन लगावै तीर !!
माझी पत तुमच्याच हातात आहे , माझ्या जिवनाची नौका तुजविण कोण पार नेणार ??
तसे तर खूप काही लिहावयाचे होते…
पण शंभुछत्रपतींनी आणि शिवछत्रपतींनी सर्वात महत्त्वाचे शिकवले ते मर्यादेय विराजते म्हणून थांबायचं……
पण एक मात्र खरयं…
शंभुछत्रपती एक अग्नी त्यांना जो हातात घेईल त्या प्रत्येकास अग्निपरीक्षा द्यावी लागते..
आम्ही ती देण्यास सक्षम ठरलो नाही.. पण अनेक पुढे येउन देतील आणि मृत्यू पलीकडे शंभु उभे करतील ही आशाच…
अवतार समिधा अर्पणम शंभु….
अक्षय चंदेल ©
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…
- वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास
- मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?
- रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir