मंडळी हल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झाला असला तरी गेल्या ३ वर्षांपासून जगभरात कोरोना प्रादुर्भावाने सर्व नागरिक त्रस्त झाले होते. कित्येक लोकांना आपला जीव या कठीण काळामध्ये गमवावा लागला. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित करून जे नियम लागू केले होते.
त्या नियमांचे उल्लंघन ज्या विद्यार्थ्यांनी किंवा नागरिकांनी केले. त्यांच्यावर लॉकडाऊन काळामध्ये शासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या सर्व गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना आता सरकारने फार मोठा दिलासा दिला आहे. गृह विभागाने या विद्यार्थी तसच नागरिकांवर कलम १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रीमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळल्यानंतर प्रक्रियेला सुरवात होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की,
” कोविडच्या काळात ज्या विद्यार्थ्यांवर किंवा नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वतः कलम १८८ नुसार विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेत आहोत. मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल.”
अस वळसे पाटील म्हणाले.
बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे दाखल झालेल्यांनासुद्धा दिलासा
महाविकास आघाडी सरकारने ज्या प्रमाणे कोविड काळात गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थी व नागरिकांना गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे दाखल असणाऱ्यांनासुद्धा सरकारने दिलासा दिला आहे.
” राजकीय किंवा बैलगाडा संबंधी जे गुन्हे असतील तर ते मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हाप्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल. त्यानंतर सरकार निर्णय होईल आणि नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील.”
अस दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.