महाराष्ट्राने नुकताच प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयीचा त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या विचारांचा पाडलेला मुडदा पहिला. राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे नाव घेत दिशाभूल करणारी वक्तव्ये केली. हे सर्व आपण पाहत आहोत. प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?
या विषयावर मी मागच्या आठवड्यात फेसबुक लाईव्ह करून त्यांचे पुस्तक दाखवून त्यातले उतारे वाचून दाखवले होते. बऱ्याच लोकांनी फोन करून त्यावर छोटेखानी लेख लिहिण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रबोधनकार ठाकरे नेमकं काय म्हणतात या विषयाचा थोडक्यात धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की शिवसेनेचा जन्म प्रबोधनकारांच्या तळपत्या लेखनातून झालेला आहे. बाळासाहेब सेनेचा ब्रँड झालेत मात्र संकल्पना प्रबोधनकारांच्या विचारातून जन्मली. नुकतीच प्रथमेश पाटलांच्या इंडी जर्नलने घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रसिद्ध पत्रकार व मुलाखतकार राजू परुळेकर यांनी प्रबोधनकार ठाकरेंनी उभा केलेला बहुजनवादी हिंदुत्ववाद बाळासाहेब ठाकरे यांनी कसा मोडला,
त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे भाजपाच्या व संघाच्या हिंदुत्ववादाच्या मागे लागून बाळासाहेब ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंनी वाढवलेली बहुजनवादी हिंदू पिढी कशी नासवली यावर सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यामुळे जाणकारांनी ती मुलाखत मुळातून पहावी.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ?
प्रबोधनकार ठाकरे आपल्या पुस्तकातून व आपल्या लेखनातून व्यक्त होताना अत्यंत टोकदार व धारदार लिहायचे. ते हिंदुत्ववादी होते का तर नक्कीच हिंदुत्ववादी होते पण त्यांचा हिंदुत्ववाद शेंडी-जानव्याचा – ब्राह्मणांचा – भटांचा – दगडाला देव मानणाऱ्याचा नव्हता तर हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांना आपल्या लेखणीने फाट्यावर मारत त्यांनी ईश्वराच्या व हिंदू मानवाच्या मध्ये असलेल्या दलाल भट ब्राह्मणांना दूर ठेवून समस्त हिंदू समाजाला शोषणविरहित वातावरण देण्याचा होता.
अजुन एक समजून घेतले पाहिजे की त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार मिशनरी स्वरूपाचा व्हावा असही लिखाण केलेले आहे मात्र त्याचे अधिकार त्यांनी भट ब्राह्मणांना देण्याचे नाकारले आहे. चला पाहूया प्रबोधनकार काय म्हणतात..
सध्या मुस्लिम धर्माबाबत विविध प्रकारची वाद रोजच येत असतात, ‘हिंदू धर्माचे दिव्य’ या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे पान नंबर 6 वर म्हणतात,
“आजचे हिंदुस्थानातील मुसलमान म्हणणारे आमचे देशबांधव हे पूर्वाश्रमीचे आमचे हिंदू बंधू होत. साष्टी प्रांतातल्या ख्रिस्ती बांधवांप्रमाणे हे आमचे सारे हिंदी मुसलमान पूर्वीचे अस्सल हिंदूच असल्यामुळे हिंदुस्तान आपला मायदेश आहे, हा अभिमान बाळगण्याचा त्यांना हिंदू इतका अधिकार आहे. हे अधिक विशद करून सांगणे नको.”
पुढे अजून पान नंबर 43 वरती ते म्हणतात,
“पूर्वी मुसलमानांनी हिंदूंचा छळ केला त्याचीच पुनरावृत्ती हिंदू पेशव्यांनी आपल्याच धर्म बांधवावर करून आपल्या नावाला अक्षय काळोखी लावून ठेवली. पेशवाई झाली हीच मोठी चूक झाली, असे जे मुमुक्षकर्ते पांगारकर व इतर निस्पृह इतिहासकार म्हणतात ते सर्व दृष्टींनी विचार केल्यास वाजवी नाही असे कोण म्हणेल ?”
राज ठाकरेंनी टिळकांचा उदोउदो करतांना हा उतारा वाचला नसणार. वाचला असता तर ते टिळकांना घेऊन मिरले नसते. टिळकांची हिंदू-मुस्लीम वाद लावण्यात काय भूमिका होती याचा परखड समाचार त्यांनी घेतलेला आहे.
प्रबोधनकार ‘संस्कृतीचा संग्राम’ मध्ये म्हणतात,
” जात्याच अत्यंत महत्वकांक्षी व वरचढ प्रवृत्तीच्या टिळकांना स्वदेशी मुसलमानांच्या संस्कृती साधर्माचे भान राहिले नाही आणि गणपतीचे मेळे व शिवाजी उत्सव या दोन दुधारी पात्याच्या तलवारीच्या हातवाऱ्याने त्यांनी हिंदू-मुसलमानांच्या भावना अधिकच क्षुब्ध व छिन्नभिन्न केल्या…..महाराष्ट्रातील मुसलमान हे हिंदूर्यवन: असे असून, बाह्यांगावरील कपड्यांशिवाय त्यांच्यात व हिंदुत कसलाही भेद नाही. त्यांची राहणी,आचार -विचार, उदरभरणाचे व्यवहार, संसाराची सुखदुःखे सर्वस्वी हिंदूंप्रमाणेच एकजिनसी आहेत. कारण ते जात्या मूळचे हिंदूच. पूर्वजांवर झालेल्या धर्मांतराच्या बळजबरी मुळेच ते आमच्या रक्तमासाचे आप्त संबंधी असून सुद्धा आज निव्वळ नावाला आमच्यापासून पारखे झाल्यासारखे दिसतात इतकेच….. महाराष्ट्रात तर सर्रास शुद्ध हिंदू मुशीचा मुसलमानच आढळून येतो. संस्कृतीसाम्याचा फायदा घेऊन व्यापक मिशनरी धोरणाने येथल्या मुसलमानांना कै.टिळकांनी जर आपल्याकडे ओढण्याची खटपट केली असती तर आज निदान महाराष्ट्रात तरी हा प्रश्न पुष्कळच सुटला असता खास. ‘पण ज्यांचे सर्व राजकारण मुळी जातिभेदाच्या आणि स्वजातिवर्चस्वाच्या मसाल्यांचे तेथे मुसलमानांना पुसतो कोण ? ”
भट – भिक्षुकशाही- ब्राह्मणांबद्दल प्रबोधनकारांची मते तर प्रचंड जहाल होती. प्रबोधनकार देवळांचा धर्म व धर्माची देवळे मध्ये म्हणतात,
” आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या कावळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनियेतला माणूस, माणूस असून पशूपेक्षाही पशू बनला आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या हलाखीचे मूळ भटांच्या पोटात आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठात नव्हे….. मनुस्मृती पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत. या तीन गोष्टी नष्ट करा, जाळून खाक करा की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच. प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही….. देवाच्या मूर्ती साठी आणि देवळांच्या किर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल तर त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल. म्हणे ब्राह्मणानी धर्म जागविला ! ….. कोणाच्याही मनोभावाची पर्वा न करता कडवे सुधारक या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की, हे देवळे नसून सैतान खाने आहेत.”
याच विषयी पुढे ‘ खरा ब्राह्मण ‘ या पुस्तिकेत प्रबोधनकार ठाकरे यांची एक लावणी आहे त्यात ते म्हणतात,
ब्रह्मदेवाचा बाप भट बनला जी !
झाली धर्माची पातळ भाजी !!
चार वर्णाच्या चार कोटी जाती !
क्षत्र वैश्यांची केली चिकनमाती !
शूद्र दुनियेचा बामन गाजी हो !!
देव राहिला पल्याड ! बामण राजा अल्याड !
त्याचं लागलं लिगाड ! जो तो भीतो,
भटा करतो जी जी !!
झाली धर्माची पातळ भाजी !!!
आमदार चरण वाघमारे यांची भाजपमधून हकालपट्टी
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या बाबतीत झालेल्या वादावर ‘ ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’ या पुस्तकात प्रबोधनकार म्हणतात,
” स्वराज्याचा पाया शिवाजीसारख्या महापुरुषाच्या हातून ठाकठीक बसल्यावर हिंदू धर्माचा ही पाया पुनश्च ठाकठीक बसवून धर्म व राजकारण यांची अभेद्य जोडी एकत्र करण्याचा विचार निघाला आणि त्याचे पर्यावसन शिवाजी महाराजांना शास्त्रोक्त राज्याभिषेक करावा या बेतात झाले. हा राज्याभिषेकाचा प्रश्न त्या काळच्या परिस्थितीचा विचार करता इतका महत्त्वाचा व अत्यावश्यक होता की त्याला विरोध करण्याची नुसती कल्पना करणारी मस्तकं महाराजांनी जरी तात्काळ छाटून टाकले असते तरी अफजलखानाच्या वधा इतकेच महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य केले असते असा इतिहासकारांचा शेरा खात्रीने पडला असता. परंतु शेवटी त्या महत्त्वाच्या कार्यात भटच पडला ! (आडवा आला )…… ब्राह्मणांनी व पिंगळ्यासारख्या स्वामीनिष्ठ ब्राह्मण मुत्सद्द्यांनीसुद्धा राज्याभिषेकाची कल्पना समूळ हाणून पाडण्यासाठी कास मारली. परंतु महाराष्ट्राचे भाग्य म्हणून म्हणा किंवा त्याला स्वतंत्र राज्यस्थापनेचा ऐतिहासिक सुखसोहळा याच जन्मी याची डोळा पहायचा होता म्हणून म्हणा तत्कालीन ब्राह्मणांच्या दुराभिमानाला चित करायला अखेर एक क्षत्रिय वीरच पुढे सरसावला.”
प्रबोधनकार ठाकरेंच्या जहाल विचारांचे असे अनेक दाखले देता येतील. मला तर वाटते जे जे राजकीय लोक प्रबोधनकार ठाकरेंचे नाव घेत आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकांचे जाहीर वाचन ठेवावे.
महाराष्ट्र शासनाने, त्यात योगायोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत त्यांनी प्रबोधनकारांची पुस्तके माफक किमतीत उपलब्ध करून द्यावीत. त्यात महत्त्वाचे म्हणजे देवळांचा धर्म व धर्माची देवळे व खरा ब्राम्हण ही पुस्तके मोफत वाटप करायची व्यवस्था लावावी.
पण प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाने राजकारण करणाऱ्या, ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , ना हिंदू जननायकचा खोटा मुखवटा घालून फिरणाऱ्या राज ठाकरे यांच्यात हिम्मत आहे की प्रबोधनकारांचे साहित्य जाहीरपणे वाचून दाखवतील किंवा प्रसारित करतील. त्यामुळे लोकांनी आत्ता सजग असलं पाहिजे. तूर्तास इतकेच..
जय जिजाऊ..
संदर्भ –
१) प्रबोधनकार ठाकरे समग्र वांग्मय,खंड – चौथा- हिंदुत्व, प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.
२) प्रबोधनकार ठाकरे समग्र वांग्मय,खंड – पाचवा, प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.
३) देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे,
प्रकाशक – लोकायत पुणे
४) खरा ब्राह्मण- संपादक, गंगाधर बनबरे
५) इंडी जर्नलच्या मुलाखतीची लिंक – https://youtu.be/Nr-ujrthKrk
लेखक — पंकज मधुकर रणदिवे.
वक्ता,लेखक,ब्लॉगर,प्रवक्ता
वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्य.
9834993421,8600073161
Mail id – vidrohipankaj@gmail.com
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ?
- स्वतःच पॅनल आणि ग्रामपंचायतवर तरुणांचा विजय
- राज ठाकरेंची पुण्यामध्ये २२ मे ला सभा, अयोध्या दौरा रद्द
- राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखच्या थंड हवेत
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir