बीड मध्ये कोण मारणार बाजी?
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे अशी लढत रंगली आहे.
बीड मतदारसंघावर २००९ पासून भाजपचे वर्चस्व आहे. गोपीनाराव मुंडे यांच्या निधनानंतर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राजकारणात पदार्पण केलं आणि प्रचंड बहुमतानी त्या निवडुन आल्या. २०१९ मध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांना पराभूत केले.
या वेळेस प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु दोनवेळा खासदार राहीलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी का टाळली? पंकजा मुंडेला उमेदवारी का मिळाली? याचे उत्तर देताना पंकजा मुंडेंची कोंडी होत आहे. याच बरोबर मागील १० वर्षात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीडचा हवा तसा विकास केलेला नाही. त्यामुळे मतदारांची भाजपावर नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
परंतु महायुतीत परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, केजमधून भाजपाच्या नमिता मुंदडा, माजलगावमधुन प्रकाश सोळंके, गेवराईतून भाजापचे लक्ष्मण पवार व आष्टीतून बाळासाहेब आजबे यांच्यासह विधान परिषदेचे सुरेश धस असे एका मंत्र्यांसह सहा आमदार पंकजा मुंडेंसाठी मैदानात आहेत.
ही पुर्ण सत्ता फौज जरी मैदानात असली तरी विधानसभेवेळी एकमेकांच्या विरोधात लढलेले आणि पुन्हा लढायचे असल्याने या नेत्यांत एकमत नाही. विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचा जिल्ह्याशी कमी झालेला संपर्क, बंद पडलेला बैद्यनाथ कारखाना, या मुद्द्याचा फायदा विरोधीपक्षाला होताना दिसतोय.
बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना जयंत पाटील म्हणाले,
‘‘आमच्याकडे नेते जास्त नाहीत, पण जनता आमच्याकडे आहे. सलग पंधरा वर्षे भाजपची सत्ता असताना ते जिल्ह्याचा विकास करू शकले नाहीत. जिल्ह्यातील जनतेने दिलेल्या जबाबदाऱ्या भाजप पेलू शकला नाही.‘जीएसटी’ने शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनता हैराण झाली आहे. आतापर्यंत देशात काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी केलेल्या विकासाला शून्य ठरविण्याचे कटकारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. भाजपच्या नेत्यांनी टीकाटिपणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलावे.” असे आव्हान त्यांनी दिले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या मागे केवळ या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर एकमेव आमदार आहेत. तसेच इतर माजी आमदारांचा पाठींबा बजरंग सोनवणे यांना मिळत आहे. २०१९ मध्ये पराभवाला सामोरे जावं लागल होत. या वेळेस निवडुन यायचे असेल, तर खुप कसरत करावी लागणार आहे.
एकवीस लाखांवर मतदार असलेल्या बीड जिल्ह्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी येथील आंदोलनाचे सर्वाधिक पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. आंदोलनाचे २०० पेक्षा जास्त गुन्हे नोंद झाल्याने सकल मराठा समाज नाराज आहे.
याचा फायदा नक्कीच बजरंग सोनवणे यांना होणार आहे. परंतु मराठा समाजातील काही दिग्गज नेत्यांचा पंकजा मुंडे यांना पाठींबा आहे. त्यामुळे बिडचे राजकारण कधी कसे पलटेल? हे सांगणे कठीण आहे.
पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोघांची लडत रंगली असताना ‘वंचित’ ने अशोक हिंगे यांना रिंगणात उतरवले आहे.
बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला, तर चिंताजनक परिस्थिती आहे. मागील २० वर्षात एकही औद्योगीक वसाहत स्थापन करण्यात आली नाही. उलट अनेक उद्योग बंद पडले आहेत आणि बंद पडत आहेत. नगर- बीड- परळी रेल्वेमार्गही पुर्ण झाले नाही, अनेक खेडे गावात रस्ते नाहीत, जिल्ह्यात झालेले महामार्ग अरुंद झाल्याने आपघाताचे प्रमाण वाढले आहेत.
आत्ता लोकभा निवडणुकीत हे आश्वासनासाठी कळीचे मुद्दे बनले आहेत. अशा परिस्थितीत बीड मध्ये २००९ पासुन सत्ता गाजवणारे कमळ सत्तेत येईल की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी सत्तेत यईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.