वंचित बहुजन आघाडीला एवढं महत्त्व का दिलं जातंय?

2024 हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. मतदारापासून तर उमेदवारापर्यंत आणि कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत निवडणुकांचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. त्याचं पार्श्वभूमीवर देशाच्या राजकरणात अष्टपैलू भूमिका बजावणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अनेक पैलू आपल्याला बघायला मिळतात, त्यातलाच एक म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आज आपण जाणून घेणार आहोत, की वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी महत्त्वाची का आहे? तसेच असे कोणते घटक आहेत की ते वंचितचे महत्व अधोरेखित करतात.

वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांचा संबंध

प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून, ते मूलतः आंबेडकरवादी चळवळीतून उदयास आलेले नेते आहेत. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत केली. 1990 साली ते राज्यसभेवर गेल्याने पहिल्यांदा खासदार झाले. त्या नंतर त्यांनी 1998 च्या अकोला लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आणि 1999 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदार संघातून विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे खासदार झाले.
2018 साली प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना केली आणि आपला भारिप बहुजन महासंघ वंचितमध्ये विलीन केला. थोडक्यात असे समीकरण वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांचे आहे.

वंचित फॅक्टर चर्चेत कसा आला?

20 मे 2018 रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत वंचितने आपले उमेदवार उतरवले. त्यासाठी वंचितने AIMIM ला सोबत घेतले. 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्र काँग्रेस ने पराभवाचे खापर वंचितवर फोडले.

काँग्रेस जरी पूर्णपणे वंचितला जबाबदार ठरवत असली तरी शिर्डी, सोलापूर, अकोला ह्या तीन लोकसभा मतदारसंघात आंबेडकरवादी विचारधारेच्या मतदारांचा प्रभाव अधिक आहे. 2019 पर्यंत हा मतदार पारंपरिकरित्या काँग्रेसकडे झुकणारा होता, पण वंचितच्या उडीमुळे तो मतदार काँग्रेस पासून दुरावला गेला, असे म्हणायला जागा आहे.

असेच काहीसे झाले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे, येथून चंद्रकांत खैरे बराच काळ लोकसभेवर निवडून जात होते. कारण येथील हिंदू मतदारांवर त्यांचा प्रभाव होता. पण वंचित बहुजन आघाडीमुळे औरंगाबाद परिसरातील हिंदू-आंबेडकरवादी मतदार AIMIM च्या इम्तियाज जलील यांच्या बाजूने उभा राहिला आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचितने कोणत्याही पक्षासोबत युती-आघाडी न करता, स्वतंत्र निवडणूक लढवली आणि ह्याचा सर्वात मोठा फटका काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बसला. तब्बल 40 पेक्षा अधिक जागा, जिथे आंबेडकरवादी विचारांचे मतदार काँग्रेसकडे जाणारे होते, त्याठिकाणी आंबेडकरवादी विचारांच्या मतदारांना वंचितने अश्वासित केल्याने, महाविकास आघाडीला ह्या 40 जागांपासून वंचित रहावे लागले, साधारण असे ठोकताळे आजपर्यंत बांधले गेलेत. ह्या सगळ्यामुळे वंचित फॅक्टर चर्चेत आला.

महाविकास आघाडीला वंचितची गरज का वाटतेय?

वरती बघितल्या प्रमाणे, मतांचे विभाजन टाळणे हा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, यात काही शंका नाही.

महाराष्ट्रात 12 टक्के लोकसंख्या दलीत आणि सलग्न जाती समुहांची आहे. तब्बल 59 जाती समुदाय, ह्या 12 टक्क्याचा भाग आहेत. ह्या मतदारांना प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी हा अश्वासक चेहरा वाटतो. जो आपल्या सोबत आल्यास मतांची टक्केवारी आणि जागांची संख्या वाढवणे आघाडीला सोईचे जाईल.

तसेच गेल्या लोकसभा निवडणूकीत वंचित आणि AIMIM या दोघांनी मिळून 6 टक्के मतं मिळवली. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या वंचितने 4 टक्के मतं मिळवल्याने राज्यात पाचव्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. ही आकडेवारी बघता, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या वंचित बहुजन आघाडीचे महत्त्व अधोरेखित होते.

महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर भाजपची अस्वस्थता वाढली होती. त्यानंतर भविष्यात निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा साम-दाम-दंड-भेद असे सगळे पर्याय वापरेल असे बोलले गेले. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष फुटून भाजपाला जाऊन मिळाले. त्याचा संपूर्ण आरोप भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाला. अश्या परिस्थिती भाजपा भक्कम होत आहे, असे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होऊ शकते. अशा परिस्थितीत भाजपाला ओबीसी व्यतिरिक्त मतदार आपल्याकडे ओढण्यास मर्यादा याव्यात, असा विचार ठेवून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला फायद्याचे ठरेल.

तसेच, फुले-शाहू-आंबेडकर फॅक्टर वापरून राष्ट्रवादीचा शरद पवार गट ज्या मतदारांवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आजवर करत आलेला आहे. त्याचं मतदारांवर अजित पवार गट देखील हक्क दाखवू शकतो.

मग अश्या वेळी वंचित बहुजन आघाडी जर मविआ बरोबर असेल तर अजित पवार गटाला फुले-शाहू-आंबेडकर फॅक्टर नुसार अधिकचे मतदार आपल्याकडे घेण्यास भरपूर मर्यादा येतील आणि अंतिमतः फायदा मविआलाच होईल.

काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट, शिवसेना-ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांचं एका मुद्यावर एकमत आहे, ते म्हणजे भाजपाला थांबवणे. मग अशा वेळी महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधन यांना वंचित बहुजन आघाडीला सामील करून घेण्यास फार काही अडचण येणार नाही अशी शक्यता सध्या तरी दिसते. याही पलीकडे वंचितचा पाहिला खासदार आणि आमदार कोण निवडून येतो, हे बघणे तितकेच उत्सुकतेचे असेल हे मात्र नक्की.

आपली प्रतिक्रिया अवर्जून नोंदवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *