राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात मनुस्मृतीचा समावेश होणार का?
केंद्रसरकारने 2024 पासुन नवीन शैक्षणिक धोरण लागू केले. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत चर्चा चालू आहे. अशातच नवीन शैक्षणीक धोरणात भगवत गीता आणि मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यात येणार आहे अशी चर्चा होत आहे.
राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणात तिसरी पासून ते बारावी पर्यंत भगवत गीता आणि मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश करण्यात यावा असा राज्य सरकारने प्रस्ताव मांडला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातल्या एससीईआरटी ने राज्याचा नवीन शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. आणि ज्यांना या अभ्यासक्रमामध्ये काही सुधारणा सुचवायच्या आहेत किंवा काही आक्षेप असेल तर असे आक्षेप आणि सूचना त्यांनी मागवल्या आहेत.
मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करून देणे आणि त्याबद्दल त्यांच्या मनात अभिमान निर्माण करणे हा या आराखड्या मागचा उद्देश आहे असे सांगितले जात आहे. परंतु या आराखड्याला मोठ्या प्रमाणात विरोधकाकडून विरोध केला जात आहे आणि या वरून महाराष्ट्रातील राजकीय स्थिती तापण्याचा अंदाज दर्शवला जात आहे.
नवीन शिक्षण धोरणात भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनुचे श्लोक आणि भगवत गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा असे सुचविण्यात आले आहे. तिसरी ते पाचवी पर्यंत ०१ ते २५ मनुचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनुचे श्लोक आणि नववी ते बारावी साठी भगवत गीतेतील बारावा अध्याय याचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे.
मनुस्मृतीला वारंवार विरोध होत आला आहे. प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी “आजही मनूला आदर्श आणि पूज्य मांडणारे मन आहेत ही अतिशय निषेधार्थ बाब आहे” असे मत मांडले होते. याच मनुस्मृतीला विरोध करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आज आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळात मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे कितपत योग्य आहे असे सामान्य लोकांचे मत आहे.
मनुस्मृतीचा वापर हा आम्हाला मान्य नाही असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर सरकार ची मानसिकता काय आहे हे कळतीय अशी टीका शरद पवार यांनी या नवीन शैक्षणिक आराखड्यावरून केली आहे. सध्या या नवीन शैक्षणिक आराखड्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटण्याच्या मार्गावर आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या मते मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात समावेश म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेचा अपमान करण्यासारखं आहे असे म्हटले आहे. मनुस्मृतीमुळे महिले वर अन्याय होईल असे ते म्हणाले. त्यांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्मान करत आहे असे सांगितले आहे.
एससीईआरटी ने जाहिर केलेला अभ्यासक्रम एक आराखडा आहे आणि त्यात बदल करता येईल. लोकांकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील आणि ज्या सुधारणा सुचवल्या जातील त्याच्या आधारे नवीन अभ्यासक्रम बनवण्यात येईल असे एससीईआरटी ने सांगितले आहे.
एससीईआरटी च्या या अभ्यासक्रम आराखड्यात बदल होईल का आणि मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे का तुमचं मत काय?