Author: admin

  • भोसरी गावठाण आणि लांडेवाडीत कामांचा झगमगाट, पण मूलभूत समस्या मात्र ‘जैसे थे’!

    पिंपरी-चिंचवडच्या स्थापनेपासून शहराच्या केंद्रस्थानी असलेले भोसरी गावठाण आणि लांडेवाडी परिसर प्रभाग ७ मध्ये येतात. येथे मोठमोठे प्रकल्प उभे राहिले असले, तरी सामान्य नागरिकांचे जगणे मात्र अजूनही मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकले आहे.

    १. प्रभागाचा लेखाजोखा: बलस्थाने:

    या प्रभागात गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत:

    क्रीडा आणि आरोग्य: मारुतीराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र, सुसज्ज महानगरपालिका शाळा, जलतरण तलाव आणि अत्याधुनिक इमारत यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

    विकासकामे: इंद्रायणीनगर आणि सँडविक कॉलनी परिसरात सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते आणि सुशोभीकरण झाले आहे.

    शैक्षणिक सुविधा: अभ्यासिका केंद्राची निर्मिती करून विद्यार्थ्यांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

    २. उणिवा आणि प्रलंबित प्रश्न:-

    झगमगाटाच्या आड काही अशा समस्या आहेत ज्या नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहेत:

    सांडपाणी आणि पाणी टंचाई: भोसरी गावठाणातील सांडपाणी वाहिन्या लहान असल्याने वारंवार चोकअप होतात. लांडेवाडी आणि विकास नगरमध्ये आजही पाणी पुरवठ्याची मोठी समस्या आहे.

    रखडलेले प्रकल्प: अत्याधुनिक मत्स्यालयाचे काम निधीअभावी दुसऱ्या टप्प्यात अडकले आहे, तर बहुउद्देशीय स्टेडियमचे कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे.

    वाहतूक कोंडी: भोसरी-लांडेवाडी रस्त्यावर वाढत्या सदनिकांमुळे रहदारी वाढली असून रोजची वाहतूक कोंडी ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे.

    ३. प्रभाग ७: विश्लेषण:-

    संधी:- नवा लोकप्रतिनिधी: गेल्या ३ वर्षांपासून नगरसेवक नसल्याने प्रशासकीय राजवटीत कामे रेंगाळली आहेत. हक्काचा नगरसेवक मिळाल्यास विकास पुन्हा वेग घेऊ शकतो.

    नवीन नियोजित प्रकल्प: टपाल कार्यालयाचे स्थलांतर आणि नवीन पाणी टाकी बांधल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल

    धोके:- पावसाळ्यातील बिकट अवस्था: लांडेवाडीतील सखल भागात मुसळधार पाऊस पडल्यास पाणी साचते, ज्यामुळे रहिवाशांचे मोठे नुकसान होते.

    अपघात आणि अरुंद रस्ते: सिमेंट रस्ते झाले असले तरी काही ठिकाणी दगडी फरशीचा वापर अधिक झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

    ४. प्रभागातील समीकरणे आणि प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागात शीतल बाग, सुविधा पार्क,आपटे कॉलनी, सँडविक कॉलनी,भोसरी गावठाण, खंडोबा माळ, गव्हाणे वस्ती, लांडेवाडी, शांतीनगर,जत्रा मैदान, आणि सुविधेचा पार्क यांसारख्या महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश होतो.

    एकूण मतदारसंख्या: ३९,८०४.
    
    पुरुष मतदार: २१,९३० | स्त्री मतदार: १७,८७४.

    ५. राजकीय आखाडा: प्रमुख आवाज

    प्रभागातील नागरिक आणि स्थानिक नेते सध्या आक्रमक आहेत:

    नितीन गायकवाड यांच्या मते, क्रीडा क्षेत्रातील कामे उत्तम झाली आहेत.

    फैयाजभाई सनदी यांनी हक्काच्या नगरसेवकाची गरज व्यक्त केली आहे, कारण प्रशासक काळात नागरी समस्यांना कोणी वाली उरलेला नाही.

    मल्हारी डफळ यांनी सिमेंट रस्त्यांवरील दगडी फरशीच्या वापरामुळे ज्येष्ठांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे.

    निष्कर्ष:

    प्रभाग ७ मध्ये केवळ भव्य इमारती किंवा स्टेडियम उभारून चालणार नाही, तर पाणी आणि सांडपाण्यासारख्या गल्लीतल्या प्रश्नांवर ज्याची मांडणी मजबूत असेल, तोच यावेळेस विजयाचा वझीर ठरेल.

  • प्रभाग ६: धावडे वस्तीत समस्यांची भरती; पण फाडावी लागते कराची पावती

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग ६ हा सध्या प्रशासकीय दुर्लक्षाचा बळी ठरत आहे. ‘रेड झोन’ आणि ‘प्राधिकरण’ या तांत्रिक कात्रीत अडकलेल्या या प्रभागातील रहिवाशांकडून नियमित कर वसूल केला जातो, मात्र रस्ते, पाणी आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवताना महापालिका हात आखडता घेत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

    १. पोल्टीकल वझीरच्या मते : मतदारांचे गणित

    एकूण मतदार: ४१,२४८

    स्त्री-पुरुष प्रमाण: पुरुष मतदार (२३,५७५) आणि महिला मतदार (१७,६७१)

    आरक्षण: हा प्रभाग ४ जागांसाठी आरक्षित आहे: ‘अ-ओबीसी महिला’, ‘ब-ओबीसी’, ‘क-सर्वसाधारण महिला’ आणि ‘ड-सर्वसाधारण (खुला)’

    २. या प्रभागामधील प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागाची सीमा मोठी असून त्यात खालील भागांचा समावेश होतो:

    धावडे वस्ती, भगत वस्ती, गुळवे वस्ती, चक्रपाणी वसाहत, पांडवनगर, रोशल गार्डन परिसर आणि सद्गुरूनगर.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: “आम्ही कर भरतो, मग सुविधा कुठे आहेत?

    प्रभागातील परिस्थिती पाहता नागरिकांच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत:

    रेड झोनचा अडथळा: मोहननगर आणि पांजरपोळ भागात ‘रेड झोन’मुळे नवीन विकासकामे आणि रस्ते बांधणीला ब्रेक लागला आहे. रहिवाशांना कर भरूनही नागरी सुविधा मिळत नाहीत.

    रस्त्यांची दुरवस्था: चक्रपाणी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण रखडल्यामुळे धुळीचा त्रास वाढला असून व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

    वाहतुकीचा विळखा: धावडे वस्ती चौकात वाहतूक पोलीस नसल्यामुळे दररोज प्रचंड कोंडी होते. तसेच, मैदानावर खासगी बस पार्क केल्या जात असल्याने मुलांच्या खेळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    पाणी आणि ड्रेनेज: चक्रपाणी रोडवरील रहिवाशांना कमी दाबाने आणि अवेळी पाणीपुरवठा होतो. ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

    ४. विश्लेषण: प्रभाग ६ (पिंपरी-चिंचवड)

    बळ:- पुणे-नाशिक महामार्गाला लागून असलेला मोक्याचा औद्योगिक आणि निवासी परिसर

    उणिवा:- महामार्गाचे रखडलेले रुंदीकरण आणि रेड झोनमधील तांत्रिक पेच

    संधी:- ग्रेड सेपरेटर, पादचारी पूल आणि भुयारी मार्ग पूर्ण केल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकतो.

    धोके:- वीजपुरवठा खंडित होणे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचा लोकप्रतिनिधींवरील उडालेला विश्वास.

    ५. पोल्टीकल वझीरचा मास्टरस्ट्रोक:-

    प्रभाग ६ मध्ये यावेळी ‘रेड झोन’ मधील नागरिकांची मते निर्णायक ठरतील. जो उमेदवार “सुविधा नाही तर कर नाही” या नागरिकांच्या भूमिकेला न्याय देईल आणि ‘भोसरी रुग्णालयाजवळील बंद मार्केट’ पुन्हा सुरू करेल, त्यालाच धावडे वस्तीची जनता कौल देईल.

  • प्रभाग ४: दिघी-बोपखेलमधील विकास केवळ स्वप्नातच? सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यात प्रशासन अपयशी!

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग ४ सध्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे चर्चेत आहे. दिघी आणि बोपखेल या दोन प्रमुख गावांचा समावेश असलेल्या या प्रभागात नागरी सुविधांचे मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत. विकासाची कामे संथ गतीने सुरू असल्याने येथील मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे.

    १. पोल्टीकल वझीरच्या मते: मतदारांची आकडेवारी

    एकूण मतदार: ५२,५०३,
    
    स्त्री-पुरुष प्रमाण: पुरुष मतदार (२७,५३३) आणि महिला मतदार (२४,९६५).

    आरक्षण: हा प्रभाग ४ ‘अ-अनुसूचित जाती (SC) महिला’, ‘ब-अनुसूचित जमाती (ST)’, ‘क-ओबीसी महिला’ आणि ‘ड-खुला प्रवर्ग’ अशा चार जागांसाठी आरक्षित आहे.

    २.या प्रभागामधील समाविष्ट भाग:-

    प्रामुख्याने दिघी गावठाण, गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाड नगर, भंडारी स्कायलाईन, समर्थनगर आणि कृष्णानगर या भागांचा समावेश होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: विकासाचा ‘धिया’ गतीने सुरू:-

    प्रामुख्याने दिघी गावठाण, गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाड नगर, भंडारी स्कायलाईन, समर्थनगर आणि कृष्णानगर या भागांचा समावेश होतो.

    सांडपाण्याची समस्या: दिघी गावठाण आणि आदर्श नगरमधील सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने हे पाणी लष्करी हद्दीत सोडले जात आहे, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

    शिक्षण आणि आरोग्य: साई पार्क कॉलनीतील महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा बांधून तयार आहे, पण ती अद्याप सुरू झालेली नाही. तसेच, परिसरात सरकारी रुग्णालयाची नितांत गरज आहे.

    खेळासाठी मैदान नाही: गजानन महाराज नगरमधील खेळाच्या मैदानाच्या जागी रहिवासी घरे उभी राहिली आहेत, त्यामुळे मुलांसाठी उद्यान किंवा मैदान उरलेले नाही.

    अग्निशमन केंद्राचे काम रखडले: दिघी गावठाणामध्ये अग्निशमन केंद्राचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे.

    ४. विश्लेषण: प्रभाग ४ पिंपरी-चिंचवड:-

    बळ:- झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि नवीन गृहनिर्माण सोसायट्या.

    उणिवा:- वीज, रस्ते आणि सांडपाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव.

    संधी:- रखडलेले प्रकल्प (शाळा, भाजीमंडई, अग्निशमन केंद्र) वेळेत पूर्ण झाल्यास सत्ताधाऱ्यांना पुन्हा संधी मिळेल.

    धोके:- पावसाळ्यात होणारी सांडपाण्याची कोंडी आणि पुराचा धोका नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो.

    ५. पोल्टीकल वझीरच्या सूचना:-

    प्रभाग ४ मध्ये यावेळी ‘सांडपाण्याचा निचरा’ आणि ‘रखडलेली शाळा’ हे प्रमुख मुद्दे असतील. जो उमेदवार ‘बोपखेलला स्वतंत्र पोलीस चौकी’ आणि ‘रस्ते रुंदीकरण’ याचे ठोस नियोजन मांडेल, दिघी-बोपखेलची जनता त्यालाच आपला नेता निवडेल.

  • प्रभाग ५: लोकवस्ती दाट; पण सुविधांची लागली वाट! ‘भोसरी-दिघी’ पट्ट्यात नागरिकांचा संताप!

    पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग ५ हा कष्टकरी आणि कामगारांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. भोसरीतील गवळीनगर, आळंदी रस्ता आणि दिघी रस्ता या दोन समांतर रस्त्यांच्या दरम्यान हा दाट लोकवस्तीचा भाग वसलेला आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील नागरी सुविधा कोलमडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

    १. ‘पोल्टीकल वझीरच्या मते: मतदारांचे समीकरण

    एकूण मतदार: ४४,६९१.

    स्त्री-पुरुष प्रमाण: पुरुष मतदार (२४,०७८) आणि महिला मतदार (२०,६१०)

    आरक्षण: हा प्रभाग ४ जागांसाठी आरक्षित असून त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे: ‘अ-ओबीसी महिला’, ‘ब-ओबीसी’, ‘क-सर्वसाधारण महिला’ आणि ‘ड-सर्वसाधारण (खुला)’.

    २. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख वस्त्या

    या प्रभागात प्रामुख्याने कामगार आणि मध्यमवर्गीय वस्त्यांचा समावेश होतो:
    गवळीनगर, चक्रपाणी वसाहतीचा काही भाग, रामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर , तुकारामनगर, महादेव नगर, श्रीराम कॉलनी, आणि ज्ञानेश्वर कॉलनी.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचा ‘डोंगर’ आणि संतापलेली जनता

    प्रभागातील नागरिक अनेक मूलभूत समस्यांनी त्रस्त आहेत:

    पाणी टंचाई: तुकारामनगरमधील पाण्याची टाकी जुनी आणि गळकी झाली आहे. गुरुदत्त नगरमध्ये नवीन टाकी बांधून तयार आहे, पण तिचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

    रस्त्यांची दुरवस्था: दिघी रस्त्याचे डांबरीकरण रखडले असून अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. आळंदी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.

    वाहतूक कोंडी: भोसरी-आळंदी रस्त्यावर अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणामुळे दररोज भीषण वाहतूक कोंडी होते.

    वीज आणि ड्रेनेज: परिसरात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ड्रेनेज लाईन चोक झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहते, ज्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.

    ४. विश्लेषण: प्रभाग ५ (पिंपरी-चिंचवड)

    बळ:- दाट लोकवस्तीमुळे राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रभाग.

    उणिवा:- अंतर्गत रस्त्यांचे रखडलेले डांबरीकरण आणि अनियमित पाणीपुरवठा.

    संधी:- नवीन पाणी टाकी सुरू करून आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारून जनतेचा विश्वास जिंकण्याची संधी.

    धोके:- ‘ट्रॅफिक’ आणि ‘अस्वच्छते’मुळे व्यापारी आणि रहिवाशांमध्ये असलेला सत्ताधाऱ्यांविरुद्धचा तीव्र रोष.

    ५. पोल्टीकल वझीरच्या सूचना:-

    प्रभाग ५ मध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ राजकीय घोषणा देऊन चालणार नाही. जो उमेदवार ‘पाण्याची गळती’ थांबवून ‘दिघी रस्त्याचे काम’ प्राधान्याने पूर्ण करेल, त्याच उमेदवाराला गवळीनगर आणि रामनगरची जनता आपला प्रभागाचा नेता म्हणून पसंती देईल.

  • मोशी-चऱ्होलीचा विकास ‘कोंडी’त; प्रभाग ३ मध्ये परिवर्तनाची लाट की सत्ताधाऱ्यांची पकड

    पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक ३ हा सध्या शहराच्या भविष्यातील विकासाचा चेहरा मानला जातो. चऱ्होली, डुडुळगाव आणि मोशी या भागांचा झपाट्याने विस्तार होत असतानाच, नागरी समस्यांनी इथल्या जनतेचा श्वास कोंडला आहे.

    १. प्रभागाचे बलस्थान :-

    वाढते नागरीकरण: हा प्रभाग शहराची नवी ओळख बनत असून मोठ्या गृहप्रकल्पांमुळे सुशिक्षित मतदारांची संख्या वाढत आहे.

    महत्त्वाची कनेक्टिव्हिटी: पुणे-नाशिक महामार्ग आणि प्रस्तावित डीपी रस्त्यांमुळे हा भाग मोक्याचा ठरत आहे.

    पूर्ण झालेली कामे: चऱ्होली-डुडुळगावमधील स्मशानभूमी, अग्निशमन केंद्र आणि टपाल कार्यालय यांसारखी कामे मार्गी लागली आहेत.

    २. कमतरता आणि उणिवा:-

    पायाभूत सुविधांचा अभाव: नियमित कर भरूनही रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.

    रखडलेले प्रकल्प: १८ मीटरचे रस्ते, ग्रंथालय आणि उद्यानांची कामे अनेक वर्षांपासून केवळ कागदावरच आहेत.

    प्रदूषण आणि कचरा: कचरा डेपोच्या दुर्गंधीमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

    ३. निवडणुकीचे पोल्टीकल वझीरचे विश्लेषण:-

    संधी:- नवा चेहरा: प्रस्थापित नेत्यांविरुद्ध असलेल्या नाराजीमुळे सुशिक्षित आणि नवीन उमेदवारांना मतदारांची पसंती मिळू शकते.

    धोके:- धुळीची समस्या: मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बांधकामांमुळे वाढलेली धूळ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

    वाहतूक कोंडी: पुणे-नाशिक महामार्गावरील रोजची वाहतूक कोंडी हा मतदारांच्या संतापाचा मोठा मुद्दा आहे.

    ४. प्रभागातील प्रमुख वस्त्या आणि समीकरणे:-

    या प्रभागामध्ये मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली या तीन प्रमुख गावांचा समावेश होतो. येथील मतदारसंख्या साधारण ७२,१०६ असून यात पुरुष मतदार (३७,५८४) आणि स्त्री मतदार (३४,५१३) यांच्यात फारसा फरक नाही, त्यामुळे महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरेल.

    ५. कळीचे प्रश्न (ज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे):

    कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा.

    कचरा घंटागाड्यांची अपुरी संख्या.

    क्रीडांगणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रांची कमतरता.

    ६. राजकीय आखाडा:-

    सध्याच्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवर संतोष बोराटे, बालाजी बुधवत आणि ज्ञानेश्वर बोराटे यांसारखे स्थानिक कार्यकर्ते नागरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. प्रभागाचे आरक्षण पाहता (अ- अनु. जाती महिला, ब- नामाप्र, क- महिला राखीव, ड- सर्वसाधारण), सर्वच पक्षांना योग्य उमेदवार निवडण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

    निष्कर्ष:-

    प्रभाग ३ मधील जनता आता फक्त ‘टॅक्स’ भरण्यासाठी तयार नाही, तर त्यांना त्यांच्या हक्काचा विकास हवा आहे. जो नेता कचरा डेपोची समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवेल, तोच या निवडणुकीचा खऱ्या अर्थाने राजा ठरेल.

  • प्रभाग २: जाधववाडी-बोऱ्हाडेवाडीत विकासाची ‘नांदी’ कधी? रिंगणात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग २ हा सध्या विकासाच्या प्रतीक्षेत असलेला महत्त्वाचा प्रभाग आहे. २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून चिखली गावठाण, जाधववाडी आणि बोऱ्हाडेवाडी या भागांचा चेहरामोहरा बदलतोय, पण मूलभूत प्रश्न सोडवण्यात अद्याप यश आलेले नाही.

    १. पोल्टीकल वझीरच्या मते : मतदारांचे गणित

    मतदार संख्या: या प्रभागात एकूण ६९,५१८ मतदार असून, पुरुष मतदार (३७,५८७) हे स्त्री मतदारांपेक्षा (३१,९२२) थोडे अधिक आहेत.

    मिश्र वस्ती: मध्यमवर्गीय नोकरदार आणि कामगार वर्ग अशा दोन्ही थरातील मतदारांचे येथे प्राबल्य आहे.

    आरक्षण: हा प्रभाग ‘अ-ओबीसी महिला’, ‘ब-सर्वसाधारण महिला’ आणि ‘क व ड-सर्वसाधारण’ अशा पद्धतीने आरक्षित आहे.

    २. या प्रभागामधील प्रमुख भाग:-

    या प्रभागात खालील महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश होतो:

    चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर आणि कुदळवाडी भाग.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचे ‘चक्रव्यूह’

    प्रभागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींसमोर अनेक गंभीर मागण्या मांडल्या आहेत:

    पाणी समस्या: वडाचा मळा आणि जाधववाडी परिसरात दूषित पाणी येते, ज्यामुळे नागरिकांना दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे.

    वाहतुकीची कोंडी: विठ्ठल मंदिर चौक, शिवरस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण आहेत.

    अतिक्रमणाचा विळखा: खेळासाठी आरक्षित असलेल्या रामायण मैदानावर वाहनचालकांनी अनधिकृतपणे ताबा मिळवला आहे, ज्यामुळे मुलांना खेळायला जागा उरलेली नाही.

    आरोग्य आणि स्वच्छता: ड्रेनेजमधून मैलमिश्रित पाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढले आहे.

    ४. विश्लेषण: प्रभाग २ पिंपरी-चिंचवड:-

    बळ:- जिल्हा सत्र न्यायालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पोलीस आयुक्तालय यांसारख्या महत्त्वाच्या संस्था याच भागात आहेत.

    उणिवा:- अनियमित कचरा संकलन आणि अंतर्गत रस्त्यांवर उडणारी धूळ.

    संधी:- रखडलेले रस्ते रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपुलाचा प्रश्न जो सोडवेल, त्याला मतदारांची पसंती मिळेल.

    धोके:- अपुऱ्या क्रीडा सुविधा आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये असलेला सत्ताधाऱ्यांविरुद्धचा तीव्र रोष.

    ५. पोल्टीकल वझीरच्या सूचना :-

    प्रभाग २ मध्ये यावेळी विकास की केवळ घोषणा’ हा मुख्य मुद्दा असेल. जो उमेदवार ‘शुद्ध पिण्याचे पाणी’ आणि ‘वाहतूक कोंडीतून मुक्ती’ याचे लिखित आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता दाखवेल, तोच या निवडणुकीत बाजी मारेल.

  • प्रभाग ३८: नागपूर मनपा निवडणूक: काँग्रेसच्या ‘बालेकिल्ल्यात’ भाजपचे मोठे आव्हान; सर्वात लहान प्रभागात कोणाचा लागणार ‘नंबर’

    नागपूर महानगरपालिकेच्या भौगोलिक रचनेत सर्वात लहान असलेला प्रभाग ३८ (जयताळा-हिंगणा नाका) यंदा राजकीयदृष्ट्या सर्वात मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये या प्रभागात काँग्रेसने वर्चस्व गाजवत सर्व जागा जिंकल्या होत्या, पण २०२६ च्या निवडणुकीत भाजपने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी कंबर कसली आहे.

    १. राजकीय चढाओढ: वर्चस्व टिकवण्याची लढाई

    या प्रभागात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच होणार असल्याचे चिन्हे आहेत:

    काँग्रेसचा बालेकिल्ला: प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने येथे आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रफुल्ल गुडधे यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने धूळ चारली होती.

    भाजपचे ‘एन्ट्री’ प्लॅनिंग: या प्रभागात भाजपसाठी तिकीट मिळवण्यासाठी मोठी चढाओढ आहे. विशेषतः ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या निर्णायक असल्याने भाजप येथे ‘सोशल इंजिनिअरिंग’चा वापर करण्याची शक्यता आहे.

    काट्याची टक्कर: प्रफुल्ल गुडधे यांनी स्वतः निवडणूक लढवण्याऐवजी कुटुंबातील कोणाला संधी द्यायची, यावर चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपकडून माहेश्वरी पटले यांचे नाव आघाडीवर आहे.

    २. प्रभाग ३८ मधील प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागाचा विस्तार मर्यादित असला तरी नागरी प्रश्नांचा गुंता मोठा आहे:

    कल्याण नगर, जलतरण सोसायटी, वासुदेव नगर,शास्त्री ले-आऊट,अध्यापक ले-आऊट आणि शारदानगर , दुुबे ले-आऊट, हिरणवार ले-आऊट ,रमाईनगर टाकळी सिम, राजेंद्रनगर, हिंगणा नाका परिसर,जयताळा वस्ती, शिवणगाव भोसलेनगर, एकात्मता नगर, दाते ले-आउट आणि शास्त्री नगर वडस्कर ले-आऊट.

    ३. ग्राऊंड रियालिटी: ‘हाय-प्रोफाईल’ प्रभागातील ज्वलंत प्रश्न

    प्रभागातील नागरिक खालील समस्यांमुळे त्रस्त असून निवडणुकीत हेच कळीचे मुद्दे ठरतील:

    जयताळा बाजाराची दुर्दशा: जयताळा बाजारात योग्य जागा नसल्याने विक्रेते आणि ग्राहकांना मोठा मनस्ताप होतो. रस्त्यावरच बाजार भरत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते.

    सार्वजनिक सुविधांचा अभाव: प्रभागात सार्वजनिक शौचालयांची मोठी कमतरता आहे. तसेच, प्रभागाचा विस्तार मोठा होऊनही पुरेसे उद्यान आणि क्रीडांगण विकसित झालेले नाही.

    अतिक्रमण आणि अनधिकृत झोपड्या: अनेक ठिकाणी झाडे कापून अनधिकृत झोपड्या वसविल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

    गुन्हेगारी आणि सुरक्षा: हिंगणा नाका आणि जयताळा परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलिसांचे नियंत्रण नसल्याची भावना रहिवाशांमध्ये आहे.

    वाहतूक कोंडी: जयताळ्याकडे जाणाऱ्या वळणावरील रस्ता अरुंद असल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

    ४. जुने निकाल/ इच्छुक यादी:-

    २०१७ चे विजयी शिलेदार (काँग्रेस):

    उज्वला बनकर, प्रफुल्ल गुडधे आणि प्रणिता शहाणे

    भाजपचे इच्छुक: माहेश्वरी पटले, प्रणिता गुडधे, सपना हिरणवार, राजेंद्र वानखेडे, राजेश मेश्राम आणि अजय उके

    काँग्रेसचे इच्छुक: सागर बनकर, कुमुद गुडधे, शैलेंद्र ढोरे, शिवराज नितनवरे आणि विकास बनकर.

    ‘पॉलिटिकल वझीर’चे मत:

    प्रभाग ३८ मध्ये केवळ ‘काँग्रेसच्या लाटेवर’ विसंबून चालणार नाही. येथील मतदार आता जयताळा बाजाराचे पुनर्वसन आणि वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या नेतृत्वाच्या शोधात आहे. ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या मतदारांचे पाठबळ ज्याला मिळेल, तोच या बालेकिल्ल्याचा नवा नेता ठरेल.

  • प्रभाग १: चिखलीत लोकसंख्या सुसाट, पण सुविधांचा वेग धिमा; ‘रेड झोन’ची टांगती तलवार कायम!’

    पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग १, म्हणजेच चिखली परिसर, सध्या एका विचित्र कात्रीत सापडला आहे. औद्योगिक पट्ट्यामुळे येथे लोकसंख्येचा ओघ प्रचंड वाढला आहे, मात्र त्या तुलनेत नागरी सुविधांचा वेग मात्र कासवगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. ‘रेड झोन’च्या तांत्रिक अडचणी आणि रखडलेले रस्ते विकास यांमुळे येथील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

    १. पोल्टीकल वझीरचा मते : कामगारांच्या नगरीत कोणाचे वर्चस्व?

    मतदार संख्या: या प्रभागात एकूण ६८,७६७ मतदार असून, यात पुरुष मतदार (३७,४०१) स्त्री मतदारांच्या (३१,३६२) तुलनेत अधिक आहेत.

    कामगार वर्ग: चिखली गावठाण आणि परिसरात लघुउद्योगांची संख्या मोठी असल्याने येथे कामगार मतदारांचा कौल निर्णायक ठरतो.

    आरक्षणाचे समीकरण: या प्रभागात जागा अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब-महिला आणि क-महिला अशा पद्धतीने आरक्षित आहेत.

    २. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख वस्त्या

    चिखली गावठाण भाग , पाटीलनगर, गणेशनगर, सोनवणे वस्ती, आणि मोरेवस्ती या प्रमुख भागांचा समावेश या प्रभागात होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: विकासाच्या प्रतीक्षेत असलेले चिखलीकर

    स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या २८ वर्षांत या भागात अनेक मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाले आहे:

    रस्त्यांचे रखडलेले रुंदीकरण: साने चौक ते चिखली रस्ता आणि साने चौक ते शिवरकर चौक या रस्त्यांचे रुंदीकरण रखडल्यामुळे दररोज भीषण वाहतूक कोंडी होते.

    सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव: या भागात अनेक गुणवंत खेळाडू असूनही त्यांना सरावासाठी एकही सुसज्ज मैदान उपलब्ध नाही.

    रेड झोनचा प्रश्न: रेड झोनच्या मर्यादेमुळे अनेक बांधकामे आणि सुविधांवर कायदेशीर टांगती तलवार आहे, ज्यामुळे रहिवाशांना घरांच्या मालकी हक्काबाबत भीती वाटते.

    आरोग्य आणि शिक्षण: प्रभागात सुसज्ज सरकारी रुग्णालय (आरोग्य केंद्र) आणि महापालिकेच्या दर्जेदार शाळांची मोठी गरज आहे.

    ४.(पिंपरी-चिंचवड) विश्लेषण: प्रभाग १

    बळ:- मोठी लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्राचा कणा असलेला कामगार वर्ग.

    उणिवा :- रस्ते रुंदीकरणातील अडथळे आणि २४ तास पाणी पुरवठ्याचा अभाव.

    संधी:- रखडलेले ‘डीपी’ रस्ते पूर्ण केल्यास आणि सांडपाणी वाहिनी सुधारल्यास सत्ताधाऱ्यांना पुन्हा संधी.

    धोके :- ‘रेड झोन’ आणि गुन्हेगारीच्या वाढत्या समस्यांवर तोडगा न निघाल्यास मतदारांचा रोष ओढवला जाऊ शकतो.

    ५. पोल्टीकल वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’:-

    चिखलीमध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ रस्ते बांधून चालणार नाही, तर ‘रेड झोन’ मधील नागरिकांना दिलासा देणारा नेता जनतेला हवा आहे. जो उमेदवार ‘साने चौक ते शिवरकर चौक’ रस्ता कोंडीमुक्त करेल आणि ‘मोकाट कुत्र्यांचा उपद्रव’ थांबवेल, चिखलीची जनता त्याच्याच गळ्यात विजयाची माळ टाकेल.

  • प्रभाग ३६: उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात विरोधकांचे ‘मिशन पॉसिबल’ की भाजपचा एकतर्फी ‘रुबाब’

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३६ हा केवळ एक प्रभाग नसून भाजपसाठी ती प्रतिष्ठेची ‘राजधानी’ आहे. २०१७ मध्ये भाजपने येथे विरोधकांना पाणी पाजत चारही जागांवर विजय मिळवला होता. मात्र, गेल्या ८ वर्षांत बदललेली समीकरणे आणि वस्तीपातळीवरील प्रलंबित प्रश्नांमुळे यंदा या गडाला खिंडार पडणार की भाजप आपली विजयाची परंपरा कायम राखणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

    १. पोल्टीकल वझीर च्या मते : तिकीटासाठी अंतर्गत ‘वॉर’

    भाजपमधील इच्छुकांची गर्दी: हा भाजपचा सुरक्षित गड मानला जात असल्याने येथे तिकीटासाठी मोठी चढाओढ आहे. माजी नगरसेवकांसह भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही येथे शड्डू ठोकला आहे.

    काँग्रेसचा तगड्या चेहऱ्याचा शोध: उपमुख्यमंत्र्यांच्या प्रभागात आव्हान देण्यासाठी काँग्रेस एका अशा उमेदवाराच्या शोधात आहे जो सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरून भाजपला घेरण्यास सक्षम असेल.

    २. निवडणुकीच्या आखाड्यातील इच्छुकांची यादी :-

    या प्रभागातून रिंगणात उतरण्यासाठी दोन्ही पक्षांची तयारी जोरात सुरू आहे:

    भाजप: ईश्वर ढेंगळे, माजी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे, प्रमोद तभाने, लहूकुमार बेहते, प्रकाश भोयर, पल्लवी शामकुळे, निलेश राऊत, संजय देशमुख, प्रशांत आकांत, दिलीप तुपकर, शेखर भागवत, विनोद चावला, किशोर चन्ने, कल्पना तडस, मनीषा काशीकर, श्रुती देशपांडे, मंगेश गजभिये, राजेश हिंगणकर, देवा देहनकर, शेखर भागवत, स्नेहल गोतमारे,लता सावरकर आणि सारंग कदम.

    काँग्रेस: सूरज पन्नासे, राजश्री पन्नासे, किशोर उमाठे, रेखा बारहाते, प्रसन्ना जिचकार, जितेंद्र हावरे, अनिता ठेंगरे, पुरुषोत्तम पारमोरे, कमलदास गजभिये, अंटू हावरे आणि वैभव काळे

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: विकासाच्या झगमगाटामागील काळोख!

    जरी हा मुख्यमंत्र्यांचा प्रभाग असला तरी स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींचा पाढा मोठा आहे:

    अतिक्रमणाचा विळखा: ऑरेंज सिटी स्ट्रीट, लंडन स्ट्रीट आणि सहकार नगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुकानांचे आणि झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे.

    भटक्या कुत्र्यांचा हैदोस: मटण मार्केट आणि सहकार नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे.

    स्वच्छतेचा प्रश्न: सहकार नगरमधील कचऱ्याचे ढीग आणि अंतर्गत वस्त्यांमधील अस्वच्छतेमुळे नागरिकांचा रोष वाढत आहे.

    सुरक्षेचा अभाव: अनेक अंतर्गत वस्त्यांमध्ये पथदिवे योग्य पद्धतीने कार्य करत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    ४. विश्लेषण: प्रभाग ३६

    बळ:- देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असल्याने मिळालेले मोठे विकासनिधी आणि संघटन

    उणिवा:- ‘लंडन स्ट्रीट’ सारखे मोठे प्रकल्प पूर्ण होऊनही स्थानिक वस्त्यांमधील मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत

    संधी:- सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडे नव्या विकासकामांचे व्हिजन मांडण्याची संधी

    धोके:– तिकीट न मिळाल्यास भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता

    राजकीय वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’ :-

    प्रभाग ३६ मध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ ‘मोठे प्रकल्प’ उपयोगाचे नाहीत. जो उमेदवार ‘भटक्या कुत्र्यांची समस्या’, ‘रस्त्यांवरील अतिक्रमण’ आणि ‘वस्तीपातळीवरील स्वच्छता’ यावर काम करेल, तोच या बालेकिल्ल्याचा खरा मंत्री ठरेल.

  • प्रभाग ३७: काँग्रेस-भाजपमध्ये तिकीटासाठी ‘दंगल’ उद्यानांच्या प्रभागात राजकीय चुरस वाढली

    नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३७ हा नागपुरातील एक अतिशय महत्त्वाचा आणि सुशिक्षित वस्ती असलेला प्रभाग आहे. गेल्या निवडणुकीत येथे भाजपचे वर्चस्व होते, मात्र यंदा काँग्रेसने या बालेकिल्ल्यात भगदाड पाडण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रभागाची सर्वात मोठी ताकद म्हणजे येथील राजीव गांधी उद्यान आणि दीनदयालनगरमधील योगाभ्यासाची संस्कृती, जी संपूर्ण शहरात चर्चेचा विषय असते.

    १. पोल्टीकल वझीरचा चष्मा: तिकीटासाठी चढाओढ:-

    आरक्षणाचा फेरा: या प्रभागातील काही जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे दिग्गज पुरुष उमेदवारांची कोंडी झाली आहे. माजी नगरसेवक प्रमोद तभाने यांच्यासारख्या नेत्यांना आता प्रभागाबाहेर किंवा नवीन जागेचा विचार करावा लागत आहे.

    काँग्रेसची ‘बिग फाईट‘: आमदार विकास ठाकरे यांचा हा प्रभाव क्षेत्र असलेला भाग असल्याने काँग्रेस येथे विजयासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे.

    बसपाचे आव्हान: गेल्या निवडणुकीत बसपाने ७ ते ८ टक्के मते घेतली होती, जी निर्णायक ठरू शकतात.

    २.प्रभागामधील प्रमुख वस्त्या:-

    या प्रभागात मध्यमवर्गीय आणि काही झोपडपट्टी भागांचा समावेश होतो

    प्रमुख वस्त्या: सुभाषनगर, कामगारनगर, बंडू सोनी ले-आऊट, गोपालनगर, पारसोडी, प्रतापनगर, अत्रे ले-आऊट, आर.पी.टी.एस. परिसर, तात्या टोपेनगर, श्रद्धांनदपेठ, जगदीश नगर, टेलिकॉम नगर, जीवन छाया सोसायटी, स्वरूपनगर, स्वावलंबीनगर आणि दीनदयालनगर

    ३. निवडणुकीच्या आखाड्यातील ‘योद्धे’ :-

    दोन्ही पक्षांतर्फे इच्छुकांची यादी मोठी आहे

    काँग्रेस: प्रसन्ना बोरकर, प्रशांत कापसे, पंकज निघोट, मंगेश कामोणे, प्रज्ञा राकेश पन्नासे, गडफने , मालती कापसे, मधू विनय राऊत, राहुल जगताप, आणि स्मिता उत्तम सोमुकवर.

    भाजप: वर्षा उगले, नितीन महाजन, शालिक कडू, सोनाली कडू, गोपाल बोहरे, पारेंद्र पटले, दिलीप दिवे, विवेक मेंढी, विवेक तरासे, नंदा जिचकार, अश्विनी जिचकार, वर्षा ठाकरे, वर्षा चौधरी, अनसूया गुप्ता, आणि ॲड. सविता कांबळे.

    ४. जनतेचा जाहीरनामा: उद्यानांच्या पलीकडील समस्या:-

    बाहेरून सुंदर दिसणाऱ्या या प्रभागात आतल्या बाजूला अनेक समस्या आहेत

    रस्त्यांची दुरवस्था: लहान वस्त्यांमध्ये आजही रस्त्यांचे काम अर्धवट असून नागरिकांना मोठा त्रास होतो.

    पार्किंग आणि अतिक्रमण: हॉटेल आणि दुकानांमुळे मुख्य मार्गांवर पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. फूटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे.

    पावसाचे पाणी: पडोळे चौकात पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे.

    मोकाट कुत्रे: परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    ५. प्रभाग ३७ विश्लेषण:

    बळ:- उच्चशिक्षित मतदार आणि उद्यानांमुळे निर्माण झालेली प्रभागाची चांगली प्रतिमा

    उणिवा :- पावसाळ्यातील पाणी साचणे आणि पार्किंगच्या समस्यांकडे झालेले दुर्लक्ष

    संधी:- काँग्रेससाठी आमदार विकास ठाकरे यांच्या प्रभावामुळे पुनरागमनाची संधी

    धोके:- आरक्षणाच्या बदलामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची होणारी बंडखोरी भाजपसाठी धोक्याची ठरू शकते.

    राजकीय वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’ :-

    प्रभाग ३७ मध्ये मतदार अतिशय जागरूक आहेत. जो उमेदवार ‘पार्किंगच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा’ आणि ‘पडोळे चौकातील पाण्याचा निचरा’ करण्याचे नियोजन मांडेल, त्यालाच दीनदयालनगर आणि प्रतापनगरची जनता कौल देईल.